News

अभिनंदन यांनी गोपनीय कागदपत्रे गिळली.

69Views

श्रीनगर :- 

 त्यांनी नुकतीच विमानातून उडी घेतली होती. आता ते आपल्या मायभूमीत नव्हते. समोर लोकांचा जमाव हातात दगड घेऊनच उभा होता. अशा परिस्थितीतही विंग कमांडर अभिनंदन यांनी मोठे धैर्य दाखवले. त्यांच्याकडे पिस्तूलही होते, मात्र त्यांनी निशस्त्र लोकांवर गोळी चालवली नाही. भारतीय हवाई दलाची गोपनीय कागदपत्रे पाकिस्तानच्या हाती लागू नयेत म्हणून चतुराईने त्यांनी काही कागदपत्रे चावून गिळून टाकली, तर काही कागदपत्रे पाण्यात भिजवली. पाकिस्तानी विमानांना पळवून लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानच्या हाती गवसलेल्या अभिनंदन यांचे शौर्य पाहून देशातील जनतेला तर अभिमान वाटलाच, मात्र पाकिस्तानही त्यांचे शौर्य आणि देशभक्ती पाहून अवाक् झाला.

आपण पाकिस्तानच्या भूमीवर आहोत हे कळल्यानंतर अभिनंदन यांनी सर्वप्रथम देशाच्या सुरक्षेचा विचार करून गोपनीय कागदपत्रांचे चार तुकडे करून ते गिळून टाकले. त्याच प्रमाणे सर्व्हायव्हल किटमधील दुसरी कागदपत्रे बाजूच्या तलावात फेकून दिली. यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी त्याना पकडले आणि पाक लष्कराच्या स्वाधीन केले. पाक लष्कराच्या ताब्यात जाण्यापूर्वी अभिनंदन यांनी जमावाला घाबरवण्यासाठी आपल्या पिस्तूलने हवेत गोळीबार देखील केला.

अभिनंदन यांची कागदपत्रे तलावात मिळाली

टाइम्स ऑफ इंडियाने प्राप्त केलेल्या काही अधिकृत कागदपत्रांनुसार, विंग कमांडर अभिनंदन यांना मोहम्मद रज्जाक चौधरी, शोएब आणि रजा या तीन पाकिस्तानी नागरिकांनी भिंबर जिल्ह्यात नियंत्रण रेषेपासून ७ किमी दूर असलेल्या हौरान या गावात पकडले. ज्या तलावात अभिनंदन यांनी कागदपत्रे फेकली, त्या तलावातून रक्त आणि मातीने भरलेले काही कागदपत्रे, ‘सर्व्हायव्हल ऑन लँड’ हे एक गुलाबी रंगाचे पुस्तक, एक निळ्या रंगाची वही आणि एक नकाशा हस्तगत करण्यात आला आहे.

अभिनंदनना तीन लोकांनी पकडले

पाकिस्तानी इंग्रजी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, राजकीय कार्यकर्ता असलेल्या ५८ वर्षीय मोहम्मद रज्जाक या पाक नागरिकाने बुधवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास हवाई लढाई सुरू असल्याचे पाहिले. त्यावेळी भारतीय हवाई दलाच्या एका विमानाने पाक विमानाला पिटाळून लावत असताना नियंत्रण रेषा पार केली. रज्जाक यांनी आपल्या घरापासून काही किमीच्या अंतरावर एक पॅराशूट उतरत असल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी लगेच आपले मित्र शोएब आणि रज्जा, तसेच काही इतर स्थानिकांना फोनद्वारे बोलावून घेतले.

‘माझी पाठ तुटलीय, मला पाणी हवे’ 

तो पर्यंत विंग कमांडर अभिनंदन पॅरोशूटने खाली उतरले होते. त्यांनी समोर दिसणाऱ्या लोकांना विचारले की हा भारत आहे की पाकिस्तान? जमावातील कुणी तरी म्हटले की हा भारत आहे. यानंतर अभिनंदन यांनी भारताच्या समर्थनात घोषणा दिल्या आणि हे ठिकाण नेमके कोणते आहे असे विचारले. माझी पाठ तुटून गेली आहे, मला पाणी द्या, असेही अभिनंदन यांनी तेथील लोकांना सांगितले.

हवेत गोळीबार करून तलावात उडी मारली

इतक्यात जमावातील एकाने सांगितले की हे किल्ला नावाचे ठिकाण आहे. यानंतर जमावाने पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देणे सुरू केले आणि अभिनंदन यांना मारहाण केली. आपला बचाव करण्यासाठी अभिनंदन यांनी पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. अधिकृत कागदपत्रांवरून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनंदन यांनी गोपनीय कागदपत्रे चावून गिळली आणि जमावापासून वाचण्यासाठी त्यांनी तलावात उडी मारली.

जमावाने त्यांना तलावातून बाहेर काढले आणि त्यांच्याकडे असलेली काही कागदपत्रे काढून घेतली. एका युवकाने अभिनंदन यांच्या पायावर गोळी झाडली. त्यानंतर अभिनंदन खाली कोसळले. नंतर जमावाने अभिनंदन यांना मारहाणही केली. काही वेळानंतर पाक लष्कराच्या सहा सैनिकांनी अभिनंदन यांना ताब्यात घेतले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply