nagpurruralNews

अशोक चव्हाण:मोदींचे सरकार टिंगलटवाळीखोर

10Views

नागपूर:-

‘दोन महिन्यांनंतर युद्ध सुरू होणार आहे. जुमलेबाजी सुरू होईल. फेकूंना मोकळे आकाश राहणार आहे. त्यांच्या गेल्या पाच वर्षांतील फेकींवर विश्वास ठेवू नका. आतापर्यंत हे देशाची टिंगळटवाळीच करीत आहेत. जनतेला काय मिळाले, हे देशाला माहिती आहे. त्यामुळे सर्जिकल स्ट्राइकचा उदोउदो करीत श्रेय लाटून घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरुद्धच सर्जिकल स्ट्राइक करा’, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. पोलिस लाइन टाकळीजवळील सद्भावना लॉन येथे जनसंघर्ष यात्रेचा समारोप रविवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते.

चव्हाण म्हणाले, ‘काँग्रेसला विदर्भाने चांगल्या व कठीण काळातही साथ दिली आहे. त्यामुळे आता जुने दिवस परत येत आहेत. झालेल्या चुका सुधारण्याची वेळ आहे. पाच वर्षांत आलेल्या जाहिरातीतील आश्वासने कागदावरच आहेत. सुटाबुटाचे सरकार आता विदेशातच मिरवित आहे. देशात त्यांच्या पायाखालची वाळू पाच राज्यांतील निवडणुकांमुळे घसरली आहे. क्षणोक्षणी ते संविधानाची नियमावली पायदळी तुडवित आहेत. निव्वळ ‘चरखा’ चालवून कुणी महात्मा गांधी बनू शकत नाही. जगातील सर्वात उंच पुतळा बनविणाऱ्याची उंची संकुचित व कमी आहे, ही देशाची शोकांतिका आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते. सीबीआयच्या प्रमुखाला चपराशाप्रमाणे काढले जाते. जन्मभर, तहहयात आपलीच सत्ता राहील, या आविर्भावात राहणाऱ्यांनी लोकशाहीची विटंबनाच केली आहे. कोट्यवधी खर्च करून सत्ता येत नाही, हे त्यांना कळणे आवश्यक आहे. म्हणूनच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.’

राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी तीन राज्यांतील निवडणुकांच्या संकेताची आठवण करून देत संघाच्या सुनियोजित पद्धतीचा सामना करण्याचे आवाहन केले. भाषणाने पक्ष बळकट होत नाही. कार्यकर्त्याचा संघर्ष पक्ष बळकट करतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी मेट्रो काँग्रेसने आणल्याचे सांगत, यापूर्वी शहरात सिमेंटचे रस्ते नव्हते का? असा प्रश्न केला. रामदेवबाबा हे भाजपचे एजंट असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला. काँग्रेसचे विधिमंडळातील उपनेते आमदार विजय वडेट्टीवार, माजी खासदार नाना पटोले यांचेही भाषण झाले.

प्रास्ताविक काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, संचालन विशाल मुत्तेमवार यांनी केले. मंचावर पक्षाचे प्रदेश प्रभारी सचिव आशिष दुआ, आमदार सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, प्राचार्य बबनराव तायवाडे, माजी आमदार एस. क्यू. जमा, आशिष देशमुख, नाना गावंडे, अभिजित सपकाळ, अतुल लोंढे, उमाकांत अग्निहोत्री, अनंत घारड यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते.

सावरकर, वाजपेयींचा माफीनामा

‘स्वातंत्र्यलढ्याशी काडीचाही संबंध नसलेला रा. स्व. संघ आज देशप्रेमाची भाषा सांगत आहे. महात्मा गांधी, सरदार पटेल यांना आपल्या विचाराचे मानत आहेत. गांधीजींना एकदा नव्हे तर सातवेळा मारण्याचा प्रयत्न झाला. सरदार पटेलांचे पत्र बाहेर आले तर सर्व उघड होईल. इंग्रजांनी अटक केल्यानंतर वि. दा. सावरकर माफीनामा लिहून देत तुरुंगाबाहेर आले. १९४२च्या आंदोलनात अटक झालेले दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही तुरुंगात माफीनामा लिहून दिला, असा या विचारांचा इतिहास आहे. तरीही, त्यांना मान दिला जातो. हा इतिहास ते विसरले’, असे माजी आमदार उल्हास पवार यावेळी म्हणाले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply