News

आठ हजार कोटींचा हवाला घोटाळा !

12Views

नागपूर:

सीताबर्डीतील रेणुकामाता बहुउद्देशीय सहकारी नागरी पतसंस्थेमार्फत (मल्टीस्टेट) तब्बल आठ हजार कोटींचा हवाला घोटाळा झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ‘मनीलाँड्रिंग’ प्रकरणात मुंबईतील पतसंस्थेच्या माजी व्यवस्थापकाला अटक केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मच्छिंद्र खाडे, असे अटकेतील माजी व्यवस्थापकाचे नाव आहे. त्यांची चार दिवसांची ईडी कोठडी घेण्यात आली आहे. या बँकिंग हवालाचे केंद्रबिंदू नागपूर आहे. नागपुरातील रेणुका माता पतसंस्थेतून इंदूर, कोलकोत्ता, दिल्ली, मुंबई, गुजरात,आंध्रप्रदेश ,कनार्टकसह संपूर्ण देशभरात बँकिंग हवाला करण्यात आला. सेंट्रल एव्हेन्यूवरील राष्ट्रीयकृत बँकेत बनावट खाती उघडून हा हवाला घोटाळा झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खाडे यांनी विविध व्यक्ती व कंपन्यांच्या नावे खाती उघडून प्रत्येकाच्या नावे लाखो रुपये असे एकूण कोट्यवधी रुपये आरटीजीएस सुविधा असलेल्या बँक खात्यात जमा केले. बेमालूमपणे अनेकांची दस्तऐवजावर स्वाक्षरी करून ती रक्कम घोटाळ्याशी संबंधित कंपनी व व्यक्तींना देण्यात येते. यासाठी खाडे यांना मोठ्या प्रमाणात कमिशन मिळत असे. मुंबईतील आतापर्यंतच्या तपासादरम्यान १२० कोटी रुपये आरटीजीएस व एनईएफटीद्वारे हाँगकाँगमधील कंपन्यांना पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ईडीने डीबी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या हवाला घोटाळ्यात योगेश्वर डायमंड प्रायव्हेट लिमिटेड, मे.श्री चारभुजा डायमंड प्रायव्हेट लिमिटेड व मे.कनिका जेम्स प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध मनीलाँड्रिंग अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान या कंपन्यांनी ओपेरा हाऊस येथील इण्डसइंण्ड बँकेत बनावट ‘विल ऑफ एन्ट्रीच्या’ (बीओई) आधारे रिझर्व्ह बँकेच्या नियमाचे उल्लंघन करून हाँगकाँग येथील खात्यात पैसे जमा केले. या व्यवहारानुसार सुमारे दोन हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिक रक्कम विदेशात पाठविण्यात आली. याप्रकरणात ईडीने अनिल चोखरा, संजय जैन (माजी संचालक रघुकुल डायमंड्स) व हाँगकाँग येथील ‘मे. स्कायलाइट’ आणि ‘लिंक फै’ कंपनीचे संचालक सौरभ पंडित यांना अटक केली. तिघांचीही २० कोटींची मालमत्ता जप्तीची कारवाई ईडीने सुरू केली आहे.

अहमदनगरमधील संस्थाही रडारवर

नागपूरसह या बँकिंग हवालाचे तार अहमदनगरमधील पतसंस्थेशीही जुळले आहेत. अहमदनगरमधील पंतसंस्थेमार्फत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात बँकिंग हवाला होत असल्याचे ईडीच्या तपासादरम्यान समोर आले आहे. त्यामुळे येथील पदाधिकारीही रडारवर आले आहेत. या बँकेतील एक पदाधिकारी खाडे यांचा खास विश्वासू आहे. लवकरच ईडी या पदाधिकाऱ्याला अटक करणार असल्याची माहिती आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply