News

‘आपली बस’ गाठून महिलेचा चालकाला चोप

26Views

 नागपूर:-

नियोजित थांब्यावर बस न थांबवणे तसेच शाळकरी मुलीला अश्लिल शिवीगाळ करणे नागपूर महापालिकेद्वारा संचालित ‘आपली बस’च्या चालकाला शनिवारी चांगलेच महागात पडले. मुलीने घरी जाऊन आईला आपबीती सांगितली. त्यानंतर आईने बस गाठून ड्रायव्हरला प्रवाश्यांसमोर चांगलाच चोप दिला.

नियोजित थांब्यावर ‘आपली बस’ थांबत नाही, अशी प्रवाशांची नेहमीच तक्रार असते. तसेच चालक-वाहकाकडून हुज्जत घालणे, शिवीगाळ हे नेहमीचाच प्रकार असल्याच्या तक्रारी आहेत. तरीही मनपा परिवहन विभाग याची गंभीर दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे. शनिवारी दुपारी शाळा आटोपून ही मुलगी बर्डी ते रामेश्वरी बसमध्ये (क्रमांक एमएच ४०-बीजी १२१४) बसली. तिच्या घराजवळील थांबा आल्यावरही चालकाने गाडी थांबविली नाही. तिने चालकाजवळ जाऊन गाडी थांबविण्यास सांगितले. त्याने मुलीला एकटी बघून अश्लील शिवीगाळ केली व हाकलून लावले. मुलगी बसच्या मागच्या सीटवर एकटीच बसून रडत होती. पुढील थांब्यावर बस थांबल्यावर ती उतरली तसेच तिने घरी जाऊन आईला पूर्ण प्रकार सांगितला. आई बस थांब्यावर पोहोचली आणि बसच्या परतीच्या फेरीमध्ये तीच बस पुन्हा दिसली. महिलेने बसमध्ये प्रवाश्यांसमोर चालकाला चांगलाच चोप दिला. प्रवाशांनीदेखील प्रकरण समजल्यावर महिलेचे समर्थन केले. प्रवाशांना नेहमी होणाऱ्या त्रासाची दखल घेत मनपा परिवहन विभाग आपल्या कुंभकर्णी झोपेतून केव्हा जागा होईल, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला..

मानकापूर चौकातही थांबत नाही बस

मानकापूर चौकातील आपली बस थांब्यावर बस थांबत नसून प्रवाश्यांना सिग्नलवरच उतरावे लागते. सिग्नल सुरू असल्यावर प्रवाश्यांना थेट पुढील चौकात उतरावे लागत असल्याचे प्रकारही या मार्गावर नेहमी घडत असतात. २१ सप्टेंबर २०१८ रोजी एक प्रवासी ‘आपली बस’ने (एमएच ३१ सीए ६२४९) बर्डी ते मानकापूर चौक प्रवास करत होता. सिग्नल हिरवा असल्याने चालकाने बस न थांबवता वेग वाढवला आणि सिग्नल पार केला. प्रवाशाने उतरायचे असल्याचे सांगितल्यावर ‘गाडी वेगात आहे, पुढे थांबवतो’, असे सांगून चक्क पुढील चौकात प्रवाशाला उतरविण्यात आले होते.

बिनधास्त करा तक्रार!

यासंदर्भात तत्काळ चौकशी करून चालकाचे निलंबन करण्यात येईल. शहरातील ‘आपली बस’ थांब्यांवर बस थांबविण्यासंदर्भात चालक आणि वाहकांना वारंवार सूचना करण्यात येतात, तरी तक्रार आल्यास कारवाईदेखील करण्यात येते. नागरिकांना काही समस्या असल्यास त्यांनी परिवहन विभागाकडे ०७१२-२७७९०९९ या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन मनपा परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी केले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply