News

इंटरनेट सेवा विस्कळीत होणार!

40Views
नवी दिल्ली:-
जगभरातील कोट्यवधी इंटरनेटवापरकर्त्यांसाठी पुढील ४८ तास तगमग, तडफड आणि अस्वस्थतेचे ठरण्याची शक्यता आहे. कारण, कोणत्याही क्षणी इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मुख्य डोमेन सर्व्हरच्या नियमित देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी तांत्रिक ‘ब्रेक’ घेतला जाणार असून सेवा सुरळीत होण्यासाठी तब्बल दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. अर्थात, नेटच्या एकूण वापरकर्त्यांपैकी केवळ १ टक्का लोकांना याचा फटका बसेल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

रशिया टुडेनं ही माहिती दिली आहे. इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाइन्ड नेम्स अँड नंबर्सकडून (ICANN) हे काम हाती घेतलं जाणार आहे. इंटरनेटवरील डोमेन नेम सिस्टिमला संरक्षित करणारी ‘क्रिप्टोग्राफिक की’ या दरम्यान बदलली जाणार आहे. यामुळं इंटरनेट अॅड्रेस बुक किंवा डोमेन नेम सिस्टिम अधिक सुरक्षित होणार आहे. सायबर हल्ल्याच्या वाढत्या घटना टाळण्यासाठी हे काम करणं आवश्यक असल्याचं ‘आयकॅन’नं स्पष्ट केलं आहे.

सुरक्षा, स्थिरता आणि डोमेन नेम सिस्टिमच्या अपग्रेडेशनसाठी ग्लोबल इंटरनेट शटडाऊन आवश्यक आहे, असं कम्युनिकेशन्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी (CRA)नं स्पष्ट केलं आहे. नेटवर्क ऑपरेटर्स किंवा इंटरनेट सेवा पुरवठादारांनी यासाठी पूर्वतयारी केलेली नसल्यास काही इंटरनेट युजर्सना याचा फटका बसू शकतो, असा इशाराही ‘क्रा’नं दिला आहे. योग्य सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून इंटरनेट सेवा बंदीचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

पूर्ण ठप्प होणार नाही!

दुरुस्तीच्या ४८ तासांमध्ये इंटरनेटची सेवा पूर्णपणे ठप्प होणार नसल्याचं ‘आयकॅन’नं स्पष्ट केलं आहे. इंटरनेट युजर्सला वेबपेज अॅक्सेस करणे किंवा एखादा व्यवहार करण्यासाठी अडचणी येऊ शकतात. युजर्स आऊटडेटेड आयएसपीचा वापर करत असल्यास ग्लोबल नेटवर्क अॅक्सेस करण्यात त्याला अडचणी येऊ शकतात.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply