News

इंदिरा गांधी महिला सक्षमीकरणाच्या आदर्श: गडकरी

30Views

नागपूर  :-

‘माझा जात आणि आरक्षणाच्या राजकारणावर मुळीच विश्वास नाही. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी आपल्या पक्षातील निष्ठावान पुरूष नेत्यांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं. अशा या कर्तृत्ववान महिलेनं आरक्षणाचा लाभ घेतला होता का?’, असा सवाल उपस्थित करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंदिरा गांधी या महिला सक्षमीकरणाच्या आदर्श असल्याचे गौरवोद्गार काढले. गडकरी यांच्या हस्ते नागपुरात महिला बचत गटाने आयोजित केलेल्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात ते महिला सक्षमीकरण या विषयावर बोलत होते. देशावर आणीबाणी लादल्याच्या कारणावरून भारतीय जनता पक्षाने नेहमीच टीकेचं लक्ष्य केलेल्या इंदिरा गांधी यांची गडकरी यांनी स्तुती केल्याने भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.

माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या कार्याचा गौरव करत असताना गडकरी यांनी भाजपच्या महिला नेत्या सुषमा स्वराज, वसुंधराराजे सिंधिया आणि सुमित्रा महाजन यांच्या नावांचाही आवर्जून उल्लेख केला.

‘मी आरक्षणाचा विरोधक नाही’

महिला आरक्षणावर बोलताना गडकरी म्हणाले की, ‘महिलांना आरक्षण मिळायला हवे, मी त्याला विरोध करणार नाही. कुणालाही जात, भाषा, प्रांत किंवा लिंगाच्या आधारे डावलताच येणार नाही. ज्ञानाच्या बळावर कुणीही व्यक्ती आपली प्रगती करून घेत असतो. आपण कधी साईबाबा, गजानन महाराज किंवा संत तुकडोजी महाराज यांचा धर्म विचारला आहे का?, आपण कधी छत्रपती शिवाजी महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा जोतिबा फुले यांची जात विचारली आहे का?, असे सवाल करत, ‘मी जात आणि धर्मावर आधारित राजकारणाच्या विरोधात आहे’ या मुद्दाही गडकरी यांनी अधोरेखित केला.

‘अभ्यासू व्यक्तींना पक्ष त्यांच्या घरी जाऊन उमेदवारी देईल’

उपस्थितांना संबोधित करताना गडकरी यांनी आगामी निवडणुकांतील उमेदवारीसाठी इच्छूक कार्यकर्त्यांनाही कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले की, ‘आपल्याला आपलं कौशल्य आणि ज्ञान वाढवण्याची गरज आहे. जर तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमचा चांगला अभ्यास असेल तर, पक्ष तुमच्या घरी येऊन तुम्हाला उमेदवारी देईल. यामुळे, नागपूर महानगर पालिकेने महिलांच्या कौशल्यविकासासाठी प्रयत्न करून त्यांचं सक्षमीकरण केलं पाहिजे’. मात्र, असं असलं तरी समाजाच्या काही वर्गांतील स्त्रियांना आरक्षणाची गरज आहे या मुद्द्यावरही गडकरी यांनी जोर दिला.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply