nagpurruralNews

उद्यापासून पुन्हा मतदार नोंदणी मोहीम.

11Views

 नागपूर:-

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी शनिवार, २ व रविवार, ३ मार्च रोजी राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

१ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये मतदार नोंदणी झाली नाही, अशा वंचित नागरिकांसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी, या उद्देशाने नुकतीच २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. तथापि, या मोहिमेवेळीही मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू न शकलेल्या नागरिकांना आणखी संधी देण्यासाठी शनिवारी आणि रविवारी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या दिवशी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. बीएलओंकडे नमुना क्र. ६, ७, ८ व ८अ चे अर्ज उपलब्ध असतील. तसेच नागरिकांना आपले मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी १ जानेवारी या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी बीएलओंकडे उपलब्ध असेल.

इथेही करू शकता नोंदणी

मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १९५० हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून मतदार नोंदणीविषयक अधिक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहनही मुख्य निवडणूक‍ कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply