News

उमा भारतींच्या दौऱ्याने राजकीय चर्चा गरम

24Views

 नागपूर :-

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव आणि अयोध्येत राममंदिर उभारण्याचा मुद्दा तापण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पाणीपुरवठामंत्री उमा भारती यांनी शुक्रवारी अचानक नागपूरचा दौरा केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. नागपुरात आगमन होताच त्यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दरबारात हजेरी लावली व संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचीही भेट घेतली. त्यांचा हा दौरा पूर्णत: गुप्त ठेवण्यात आला होता. यापूर्वीही मध्य प्रदेशच्या निवडणुकीदरम्यान त्या हेलिकॉप्टरने आल्या होत्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गुरुवारी रात्री संघाच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन सुमारे दोन तास चर्चा केली, हे विशेष.

उमा भारती यांचे सकाळी ट्रेनने येथे आगमन झाल्यानंतर त्या संघ मुख्यालयात गेल्या. लोकसभा निवडणूक न लढण्याची घोषणा केल्यानंतर संघ मुख्यालयाचा त्यांचा हा दुसरा दौरा ठरला. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी त्यांनी विविध राजकीय विषयांवर सुमारे एक तास चर्चा केल्याची माहिती आहे. ११.३० वाजताच्या सुमारास त्या मा. गो. वैद्य यांच्या निवासस्थानी गेल्या. वैद्य यांना एका वाहिनीच्यावतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि लगेच भोपाळला परत गेल्या. सरसंघचालकांशी झालेल्या चर्चेचा तपशील कळू शकला नाही. मात्र, राम मंदिराच्या राजकीय मुद्द्यावर प्रदीर्घ चर्चा झाल्याचे समजते.

उत्तर प्रदेशच्या झांशी लोकसभा मतदारसंघातून उमा भारती विजयी झाल्या. मात्र, आरोग्याच्या कारणामुळे लोकसभा निवडणूक न लढण्याची घोषणा त्यांनी केली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या भारती विधानसभा निवडणुकीत सक्रिय होत्या. दोन दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशमधील आमदारांच्या एका बैठकीत त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. हनुमानावरून सुरू असलेल्या वादावर त्यांचे वक्तव्य वादग्रस्त ठरले. केंद्रात मंत्री असतानाही त्यांनी राममंदिर व्हावे, यासाठी आक्रमक पवित्रा घेत जाहीर मत व्यक्त केले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply