NewsSports

उमेश यादवला डच्चू मिळणार?

55Views

 हैदराबाद :-

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा विचार करून, सातत्याने अपयशी ठरत असणाऱ्या सलामीवीर लोकेश राहुलला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्येही संधी मिळणार आहे. तर, एखाद्या सामन्यातील कामगिरीवरून वेगवान गोलंदाज उमेश यादवला पुन्हा एकदा वगळण्यात येऊ शकते.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये दणदणीत विजय मिळविल्यानंतर दोन्ही संघांमधील दुसरी कसोटी शुक्रवारपासून सुरू होत आहे. या कसोटीसाठीच्या संघनिवडीविषयी भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी दिलेल्या संकेतांमध्ये उमेश यादवला वगळण्यात येण्याचे स्पष्ट होत आहे. राहुल गेल्या १६पैकी १४ कसोटींमध्ये अपयशी ठरला आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा विचार करून दुसऱ्या कसोटीमध्ये त्याला कायम ठेवण्याची शक्यता आहे. तर, जसप्रित बुमराह आणि इशांत शर्मा पुनरागमन करणार असल्यामुळे उमेश यादवला स्थान गमवावे लागले. याविषयी अरुण म्हणाले, ‘दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यामध्येही उमेश फारसा खेळला नाही आणि हे दुर्दैवी आहे. संघातील अन्य गोलंदाज अतिशय चांगली कामगिरी करत आहेत, हे त्यामागील कारण आहे. मात्र, उमेश यादव खूप गुणवान खेळाडू आहे. गोलंदाजांना आलटून-पालटून संधी देण्याचे धोरण आहे आणि उमेशलाही त्यामध्ये संधी मिळते. उमेश पुन्हा एकदा संघामध्ये स्थान मिळवेल, याविषयी आम्हाला विश्वास आहे.’ दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या दोन्ही दौऱ्यांमध्ये उमेश यादव प्रत्येकी एक-एक कसोटी सामने खेळला आहे.

लोकेश राहुलला पहिल्या कसोटीमध्ये खातेही उघडता आले नव्हते. मात्र, राहुलमध्ये गुणवत्ता असल्यामुळे त्याला देण्यात आलेली संधी ही गुंतवणूक असल्याकडे अरुण लक्ष वेधत होते. ते म्हणाले, ‘त्याच्यातील तांत्रिक कच्च्या दुव्यांविषयी मला माहीत नाही. मात्र, रवी शास्त्री आणि संजय बांगर यांनी त्याच्याशी खूप चांगली चर्चा केली आहे. राहुलमध्ये प्रचंड क्षमता असल्याचा प्रशिक्षकांना विश्वास आहे. मात्र, त्याला सातत्यपूर्ण खेळी कराव्या लागतील. त्याच्यातून भविष्यात आपल्याला एक महान फलंदाज मिळू शकतो.’व्यवस्थापन संघामध्ये प्रयोग करण्याच्या विचारात नसल्याचे स्पष्ट करत, मयांग अगरवालला कसोटीमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळणार नसल्याचेही अरुण यांनी स्पष्ट केले.

पृथ्वी शॉचे कौतुक

भरत अरुण यांनी पृथ्वी शॉचे कौतुकही केले असून, प्रत्येक सामन्यामध्ये त्याच्यातील गुणवत्ता अधिक चमकून उठेल, असा विश्वासही व्यक्त केला. ते म्हणाले, ‘आपण खेळत असणाऱ्या प्रत्येक कसोटीमध्ये आपण नवे खेळाडू संघामध्ये आणू शकतो. पृथ्वी शॉने त्याच्यातील गुणवत्ता पहिल्या कसोटीमध्ये दाखवून दिली आहे. त्याने केलेल्या धावांपेक्षाही त्याने पहिलीच कसोटी खेळत असताना केलेली कामगिरी म्हणून जास्त उल्लेखनीय आहे.’ हैदराबादचा स्थानिक खेळाडू महंमद सिराजला या सामन्यामध्ये संधी मिळणार का, या प्रश्नावर थेट उत्तर अरुण यांनी टाळले. मात्र, सिराज हा कोणतीही गोष्ट लवकर शिकणारा खेळाडू आहे. हैदराबाद संघाचा प्रशिक्षक असल्यापासून मी त्याला पाहात आहे. अ संघातील त्याचा अनुभव व कामगिरीतून हीच गोष्ट दिसत आहे, असे त्यांनी सांगितले.

उमेश यादवची कसोटी कामगिरी

३९ कसोटी

१०९ बळी

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply