News

काँग्रेसच्या इच्छुकांना अनपेक्षित नावांची भीती : लोकसभेसाठी नव्या चेहऱ्यांचा शोध

26Views

पुणे :-

लोकसभेची पुण्याची जागा काँग्रेसकडेच कायम राहणार, हे आता निश्‍चित झाले आहे. त्यामुळे पक्षातील अनेक इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र उमेदवारीची संधी या इच्छुकांपैकी कुणाला मिळणार की अन्य पक्षातील आयात उमेदवारांवर पक्ष भरोसा ठेवणार याची चर्चा सुरू झाली आहे. या पलिकडे जाऊन पक्ष पठडीबाहेरचा उमेदवार शोधणार या चर्चेने इच्छुकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

पुण्याच्या जागेबाबात राष्ट्रवादीकडून अद्याप आग्रह सोडला नसल्याची जाणीव माजी उपमुख्यमंत्री अजित पवार वारंवार करून देत आहेत. मात्र या जागेबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार फारसे आग्रही नाहीत. त्यामुळे काँग्रेसची ही जागा त्यांच्याकडे कायम राहणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार कोण याची चर्चा सुरू झाली आहे. आमदार अनंतराव गाडगीळ, माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष रमेश बागवे, महापालिकेतील विरोधीपक्षनेते अरविंद शिंदे यांची नावे प्रामुख्याने घेतली जात आहेत. प्रदेश काँग्रेसकडे या इच्छुकांची यादी यापूर्वीच पाठविण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यासाठी पक्षातील निष्ठावंत इच्छुक असले तरी अन्य पक्षातील दोघांची चाचपणी करण्यात येत आहे. निवडून येण्याचा क्षमता व खर्चाची तयारी या दोन निकषांवर उमेदवार निश्‍चित करण्यात येणार असल्याने या दोघांचा विचार करण्यात येत असल्याचे या सूत्रांनी सांगितले. सध्या प्रशासकीय सेवेत असलेले एक अधिकारीदेखील या स्पर्धेत आहेत. येत्या दोन महिन्यात ते निवृत्त होणार असल्याने उमेदवार म्हणून तेदेखील पक्षाच्या संपर्कात आहेत, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply