News

काँग्रेसनं अंबानींना काय दिले?; सरकार सांगणार

24Views
नवी दिल्ली : –

राफेल करारात उद्योगपती अनिल अंबानी यांना कोट्यवधींची मदत केल्याचा आरोप काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर केल्यानंतर आता मोदी सरकारनंही काँग्रेसचा ‘उद्योगस्नेही’ कारभार चव्हाट्यावर आणण्याची तयारी केली आहे. यूपीएच्या काळात अनिल अंबानींना मिळालेल्या प्रकल्पांची यादीच सरकार तयार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राफेल करारात ऑफसेट कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी मोदी सरकारने अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्सची मदत केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. राहुल गांधी रोजच्या रोज मोदी आणि अंबानी यांच्यावर आरोप करून सरकारला कात्रीत पकडत आहेत. भाजपनंही त्यांना जशास तसं उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपीए सरकारच्या काळातल्या अखेरच्या सात वर्षांमध्ये अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाला १ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प देण्यात आले होते. या संबंधीची सर्व माहिती रस्ते व परिवहन मंत्रालय, दूरसंचार या खात्याकडून तसेच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, दिल्ली मेट्रो आदी प्राधिकारणांकडूनही संकलित केली जात आहे.

यूपीएच्या काळात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची वेगानं भरभराट झाली. पाच वर्षात ही वीज वितरण कंपनी देशातील सर्वात मोठी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी म्हणून पुढं आली, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. तर, अनिल अंबानी समूहाच्या ६ कंपन्यांशी संबंधित माहिती गोळा केली जात आहे. यापैकी अनेक कंपन्यांना त्या-त्या क्षेत्राचा अनुभव नसतानाही अनेक प्रकल्पाची कंत्राटं देण्यात आली होती, असं अन्य एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply