News

कार्यकर्त्यांची शाळा घेण्याची राज ठाकरे यांच्यावर वेळ.

19Views

पुणे :-

एखाद्या राजकीय पक्ष किंवा संघटनेच्या पक्षाध्यक्षालाच माझ्याशी चर्चा केल्याशिवाय संवेदनशील विषयावर भूमिका मांडू नये, असे जाहीर करावे लागते, तेव्हा संबंधित पक्षाचे धोरण, कार्यपद्धती, संघटनात्मक रचना यामध्येच त्रुटी असल्याचे स्पष्ट होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देणाऱ्या आणि आता मोदी यांच्या प्रत्येक भूमिकेवर व्यंगचित्राद्वारे हल्ला चढविण्यात हा पक्ष पुढे आहे. त्यामुळे, या पक्षाला नवनिर्माणातून नेमके अपेक्षित तरी काय, हे तरी एकदा पक्षाध्यक्षांनी शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत समजावून सांगण्याची वेळ आली आहे.

यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावरून निर्माण झालेल्या वादावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जाहीर पत्र सोमवारी सर्वत्र ‘व्हायरल’ झाले. या पत्रातील सर्व मजकूर संमेलनावरून उद्भवलेल्या वादावर स्पष्टीकरण देणारा असला, तरी त्यातील दोन वाक्ये पक्षाच्या संघटनेकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे द्योतक देणारी होती. कोणताही पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहत असला, तरी त्याला संघटनेची शिस्त महत्त्वाची असते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते अगदी जिल्हा-तालुका स्तरावरील नेत्यांपर्यंतच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षाची नेमकी भूमिका माहिती असणे गरजेचे असते. काही मुद्द्यांबाबत मतभेद असले, तरी पक्ष म्हणून भूमिका निश्चित असावी लागते. पक्षाचे धोरण/भूमिका किंवा एखाद्या वादग्रस्त विषयाबद्दल स्थानिक स्तरावर काय निर्णय घ्यायचा, याबाबत एकवाक्यता असावी लागते. दुर्दैवाने, राज्यात गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत असूनही मनसेचे याबाबतच्या धोरणात कायमच संदिग्धता राहिली आहे. राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांबाबत ते यापूर्वी दिसून आले होते. आत संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा ते अधोरेखित झाले आहे.

सर्व स्तरातील पदाधिकारी-कार्यकर्ते यांना पक्षाची भूमिका समजावण्यासाठी विविध कार्यशाळा, प्रशिक्षण सत्रे घेतली जातात. राष्ट्रीय स्तरावरील अनेक पक्षांकडून त्याची अंमलबजावणी होते. मनसेचे पक्षाध्यक्ष राज्याच्या दौऱ्यावर असताना, त्यांच्यामागे अजूनही कार्यकर्त्यांची झुंबड उडत असली, तरी गर्दीच्या पलीकडे पक्षाची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचते का, हा खरा प्रश्न आहे. एखाद्या संवेदनशील विषयावर भूमिका जाहीर करण्यापूर्वी माझ्याशी चर्चा करावी, असे आदेशच मनसेच्या अध्यक्षांनी दिल्याने किमान यापुढील काळात तरी मनसेच्या भूमिकेत एकवाक्यता दिसेल, अशी अपेक्षा आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply