News

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबईत जाऊन विखेंच्या भाजप प्रवेशाला विरोध केला आहे.

11Views

नगर :-

डॉ. सुजय विखे यांच्या भाजपमधील नियोजित प्रवेशामुळे अस्वस्थ झालेल्या खासदार दिलीप गांधी यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत जाऊन विखेंच्या भाजप प्रवेशाला विरोध केला आहे. तर प्रवेशाचा नियोजित कार्यक्रम एक दिवसावर येऊन ठेपला तरीही विखेंच्या गोटात अस्वस्था असल्याचे दिसून आले. भाजपमध्ये गेल्यावर खरेच फायदा होईल का, अशी शंका नगरमध्ये झालेल्या विखे समर्थकांच्या बैठकांतून व्यक्त झाली. एका बाजूला प्रवेशासाठी शक्तिप्रदर्शनाचे नियोजन सुरू असताना दुसरीकडे दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठांकडेही हालचाली सुरूच होत्या.

गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. विखे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. अखेर मंगळवारी (१२ मार्च) सकाळी ११ वाजता त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा मुंबईत भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, डॉ. सुजय यांचे वडील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व आई जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे काही दिवसांसाठी तरी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे डॉ. विखेंच्या भाजप प्रवेशानंतर नगर दक्षिणेतून त्यांची उमेदवारीही पक्की असल्याचे सांगितले जात असल्याने पक्षाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी समर्थक मात्र अस्वस्थ आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने व डॉ. सुजय यांच्या रूपाने काँग्रेसचा राज्याचा विरोधी पक्षनेता फोडल्याचे श्रेय राज्यातील पक्ष नेत्यांना मिळणार असल्याने स्थानिक नगर जिल्ह्याच्या पातळीवर असलेला विरोध मोडून डॉ. विखेंना प्रवेश देण्याचे निश्चित केल्याचे सांगितले जाते. विखे यांना पक्षात घेतले जाण्यास विद्यमान खासदार गांधींसह आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे व पालकमंत्री प्रा. राम शिंदे आणि जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्या समर्थकांचा विरोध होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारच्या विखेंच्या प्रवेश सोहळ्यास यापैकी कोण उपस्थिती लावतो, याची उत्सुकता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. सुजय यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीला काहीही फरक पडणार नसल्याचे स्पष्ट केल्याने तसेच १९९१च्या निवडणुकीत डॉ. सुजय यांचे आजोबा बाळासाहेब विखे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पराभूत केले असल्याचेही स्पष्ट केल्याने डॉ. विखे यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा विषय पवारांनी बासनात गुंडाळल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विखेंच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला व त्यांच्या मुंबईतील यंत्रणेकडून स्वसमर्थक निवडक १०० जणांना मंगळवारी मुंबईत येण्याचे फोन सुरू झाले. एवढेच नव्हे तर दक्षिणेतील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही याच यंत्रणेद्वारे उपस्थिती लावण्याचे फोन गेल्याचे सांगितले जाते. पक्षात येण्याआधीच विखेंनी पक्ष ताब्यात घेतल्याची चर्चाही यानिमित्ताने रंगली.

महिनाभरापूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमवेत झालेल्या चर्चेनुसार डॉ. सुजय यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती. शरद पवारांचीही त्याला आधी संमती होती. पण ऐनवेळी त्यांनीच या प्रवेशाबाबत आश्चर्य व्यक्त केल्याने डॉ. सुजय यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळेच त्यांनी भाजपची वाट चोखाळल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे.

गडाखांचे नाव आघाडीवर

डॉ. विखे यांनी आता भाजपची साथ करण्याचे निश्चित केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रशांत गडाख यांच्या उमेदवारीचे पारडे जड झाले आहे. अरुण जगताप व अनुराधा नागवडे अशी अन्य दोन नावे शर्यतीत असली तरी गडाख-विखे ही पारंपरिक व तुल्यबळ लढत १९९१ नंतर २८ वर्षांनी पुढच्या पिढीत घडवण्यात शरद पवारांनाच रस असल्याने प्रशांत यांच्याच उमेदवारीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

डॉ. विखे अजूनही सावध

डॉ. विखे यांनी मात्र सोमवारी सायंकाळपर्यंत सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. नगरमधील कार्यकर्त्यांची बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप प्रवेशाबद्दल ठाम निर्णय जाहीर केला नाही. ते म्हणाले, ‘कालपर्यंत आपण दोन दिवस थांबा म्हणत होतो, आता उद्या दुपारपर्यंत थांबा. तोपर्यंत नेमके चित्र स्पष्ट होईल. निवडणूक लढविणार हे नक्की, पक्ष उद्या दुपारपर्यंत कळेल.’ भाजप प्रवेश करण्यापूर्वी एक शेवटची संधी म्हणून दिल्लीत यासंबंधी प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती मि‌ळाली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply