News

गडकरींविरुद्ध तक्रार विदर्भ निर्माणची.

9Views

 नागपूर:-

फुटाळा तलावावर झालेल्या एका सभेदरम्यान ‘वेगळ्या राज्यासाठी घोषणा देणाऱ्या विदर्भवादी कार्यकर्त्यांना ठोकून काढा’, अशी सूचना करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत विदर्भ निर्माण महामंचने पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीचे कार्यकर्ते मुकेश मासुरकर, अभ्युदय कोसे, संतोष खोडे, निखिल गणेर, रविना शामकुंवर, पौर्णिमा भिलावे, राजीवकुमार म्हैसबडवे आदींनी ‘विदर्भ केव्हा देता,’ असा सवाल थेट गडकरी यांना केला. ‘विदर्भ आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा ‘, ‘देता की जाता’, ‘जय विदर्भ’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी वेगळ्या राज्याच्या मागणीची पत्रके भिरकावली. यामुळे गडकरी यांनी कार्यकर्त्यांना ठोकून काढा, अशी सूचना पोलिसांना केली होती. यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना मारहाण करून अंबाझरी ठाण्यात गुन्हे दाखल केले. दोन दिवसांपासून या घटनेचे पडसाद उमटत आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात धमकीबद्दल ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी विदर्भ निर्माण महामंचच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे केली. नितीन गडकरी यांनी २०१४ सालच्या निवडणुकीपूर्वी वेगळ्या राज्याचे लेखी आश्वासन देणाऱ्या नेत्यांची ‘कार्यकर्त्यांना ठोकून काढा’, अशी जाहीर सभेतील भाषा बरोबर नाही, असा खेद विदर्भ राज्य आंदोलन समितीसोबतच विदर्भ निर्माण महामंच व अन्य विदर्भवादी संघटना आणि नेत्यांनी केला. तसेच, गडकरी आणि व्यासपीठावर उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला.

शिष्टमंडळात तक्रारकर्ते मुकेश मासुरकर, अभ्युदय कोसे, संतोष खोडे, निखिल गणेर, रविना शामकुवर, पौर्णिमा भिलावे, राजीवकुमार म्हैसबडवे यांच्यासह महामंचचे नेते अॅड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अरुण केदार, रंजना मामर्डे, विजया धोटे, राजेश काकडे, रूपेश भोयर, गणेश शर्मा, पुजा घायडे, प्रभाकर काळे, नितीन भागवत, देविदास लांजेवार, राजन भूत आदींचा समावेश होता.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply