News

गायींच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू

23Views

संगमनेर :-

तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथे गोठ्यात शिरलेल्या दीड वर्षाच्या बिबट्यावर ३० ते ३५ गायींनी हल्ला केला. त्यामध्ये बिबट्याचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून निंबाळे येथील नर्सरीत त्याचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

उंबरी-बाळापूर शिवारात सूर्यभान रावसाहेब उंबरकर यांच्या राहत्या घराजवळच गायींचा मुक्त गोठा आहे. या गोठ्यामध्ये लहान-मोठी अशी ३० ते ३५ जनावरे आहेत. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास या गोठ्यात एका बिबट्याने प्रवेश केला. त्यामुळे गोठ्यातील गायी भीतीपोटी सैरावैरा पळत सुटल्या व त्यांनी मोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली. गायींच्या आवाजाने सूर्यभान उंबरकर, शशीकांत उंबरकर, संतोष उंबरकर यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी बाहेर येऊन पाहिले. या वेळी गोठ्यात गायी सैरावैरा पळताना दिसल्या, व एक बिबट्या त्याच्या पायाखाली तुडवला जात असल्याचे दिसले. याबाबत तत्काळ कुटुंबाने वन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाचे वनरक्षक डांगे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या वेळी त्यांनी गोठ्यात जाऊन पाहिले असता गायींच्या पायाखाली आल्याने दीड वर्षाचा नर जातीचा बिबट्या मृत झाल्याचे आढळले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून बिबट्याचे शवविच्छेदन केले आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply