NewsPetrol | Diesel Price

गॅस सिलिंडरसाठी पंधरा दिवसांचे वेटिंग.

50Views

 नागपूर :-

घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्यामुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांची डोकेदुखी अजून वाढली आहे. सिलिंडरसाठी मोबाइलवरून नोंदणी केल्यानंतरही तब्बल पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. गॅस एजन्सीद्वारे सुरू असलेल्या या गैरसोयीमुळे अनेकांची दिवाळी मनस्तापयुक्त ठरणार आहे.

शहरातील काही गॅस एजन्सीजकडून गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सबसिडीवाले सिलिंडर मिळण्यात होत असलेल्या या विलंबामुळे ऐन दिवाळीचा सण अनेकांसाठी संतापदायी ठरत आहे. मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या दरवाढीनंतर होत असलेला याप्रकारचा त्रास ग्राहकांनी का म्हणून सहन करायचा, असा सवाल आता उपस्थित झाला आहे. पटवर्धन गॅस एजन्सी, रिशा गॅस एजन्सी, भेंडे गॅस एजन्सी, कोठारी गॅसएजन्सी (कामठी), रायपुरे गॅस एजन्सी (धंतोली), गावंडे गॅस एजन्सी, मिलिंद गॅस एजन्सी (कळमेश्वर), गायकवाड गॅस एजन्सी, वर्धमान गॅस एजन्सी, चेतन आनंद गॅस एजन्सी, गौतम गॅस एजन्सी यांनी प्रत्येक ग्राहकाला सिलिंडरसाठी पंधरा दिवसांचे ‘वेटिंग’ सांगितले आहे. सबसिडी असलेले सिलिंडर देण्यास एजन्सीद्वारे कुचराई करण्यात येत असताना शंभर रुपये अधिक दिल्यास सहज उपलब्ध होत असल्याचा दावा काहींनी केला आहे. एजन्सीद्वारे सिलिंडरचा काळा बाजार सुरू असून याचा फटका सामान्य ग्राहकांना बसत आहे. सिलिंडर मिळत नसल्यामुळे सबसिडी देखील जमा होण्यात अडचण निर्माण झाली आहे. ऐन दिवाळीमध्ये सिलिंडरसाठी करावे लागणारे वेटिंग ग्राहकांसाठी त्रासदायक असून प्रत्येक सिलिंडरमागे गॅस एजन्सीद्वारे सुरू असलेली आर्थिक लूटदेखील चिंतेचा विषय ठरत आहे.

ग्राहक कल्याण परिषद दक्ष

सिलिंडरसाठी कराव्या लागत असलेल्या प्रतीक्षेबाबत अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेकडे बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. याबाबत ग्राहक कल्याण परिषदेने जनजागृती करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच गॅस एजन्सीद्वारे ग्राहकांची लूट होऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. दिवाळीमध्ये सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या मुद्द्यावर ग्राहक कल्याण परिषदेचे अध्यक्ष प्रकाश मेहाडिया यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply