nagpurruralNews

जखमी वाघाचा वनाधिकाऱ्यावर हल्ला.

26Views

नागपूर:-

देवलापार जवळ भरधाव वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वाघाने वनाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. दाट झुडपांमध्ये लपलेल्या वाघाने केलेल्या हल्ल्यात वनपरिक्षेत्र अधिकारी गंभीर जखमी झाले. रविवारी सकाळी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात ही घटना घडली. या जखमी वाघाचा शोध घेण्यासाठी वन विभागाने जोरदार मोहीम उघडली आहे. मात्र, अद्यापही वाघाला जेरबंद करण्यात यश आलेले नाही.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर शनिवारी रात्री रस्ता ओलांडणाऱ्या वाघाला भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याने तो जखमी झाला होता. वाघाला पकडण्यासाठी रविवारी सकाळी पेंच व्याघ्र प्रकल्प तसेच नागपूर प्रादेशिक वन विभागाने शोधमोहीम सुरू केली. पवनीच्या जंगलात वाघ जात असल्याचे दिसून आले होते. त्यानुसार वाघाचा शोध घेत असताना झुडपात लपलेल्या वाघाने पवनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रितेश भोंगाडे यांच्यावर हल्ला केला. पुरेशी काळजी घेत ही मोहीम सुरू असतानाही वाघाने भोंगाडे यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात भोंगाडे यांच्या हाताला तसेच इतर ठिकाणी गंभीर जखमा झाल्या. त्यांना तातडीने अॅलेक्सिस रुग्णालयात भरती करण्यात आले. भोंगाडे यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना कोणताही धोका नसल्याचे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक रवीकिरण गोवेकर यांनी सांगितले.

झुडपांमध्ये शोधण्यासाठी जेसीबीचा वापर 
या हल्ल्यानंतरही वन विभागाने शोधमोहीम सुरू ठेवली आहे. दाट झुडुपांमध्ये वाघ लपण्याची शक्यता लक्षात घेऊन जेसीबीचा वापर केला जातो आहे. वन विभागाच्या शोध पथकाला जखमी वाघ आढळूनही आला होता. मात्र दाट झुडपांमुळे त्याला ट्रँक्विलाइज करणे शोधपथकाला शक्य झाले नाही. डॉ. अंकुश दुबे, डॉ. बिलाल आणि डॉ. नंदागवळी यांच्यासह वन विभागाच्या इतर कर्मचाऱ्यांचा या शोधपथकात समावेश आहे. रविवारी संध्याकाळी अंधार पडल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली.

ग्रामस्थांना सतर्कतेची सूचना
जखमी झालेला वाघ जंगलाशेजारील गावांमध्ये जाण्याची शक्यता लक्षात घेऊन वन विभागाने ग्रामस्थांना सतर्कतेची सूचना दिली आहे. ग्रामस्थांनी जंगलात जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वाघाला आकर्षित करण्यासाठी सावज ठेवण्यात आले आहे. या शिवाय, जखमी वाघावर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप्सदेखील लावण्यात आले आहेत.

धडकेला कारणीभूत आमदाराचे वाहन!
शनिवारी रात्री ज्या वाहनाने वाघाला धडक दिली ते वाहन सध्या एक आमदार वापरीत असल्याची माहिती आहे. ‘टाटा सफारी स्टॉर्म एक्स’ या वाहनाने ही धडक दिली. त्यानंतर, या वाहनाने मनसर येथील टोल नाका पार केला. हे वाहन ‘ठाकरे’ नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदले असले तरी सध्या त्याचा उपयोग एक विद्यमान आमदार करीत असल्याची माहिती आहे. मात्र, आमदारांच्या वाहनाने वाघाला धडक दिली का याबाबत काहीही बोलण्यास वनविभागातील अधिकाऱ्यांनी नकार दिला. राष्ट्रीय महामार्ग सातच्या विस्तारीकरणावरून दोन-तीन वर्षांपूर्वी प्रशासन आणि वन्यजीवप्रेमी यांच्यात मोठा वाद झाला होता. याच महामार्गावर वाघाला धडक देण्याची ही घटना घडली आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply