News

जळगाव: माजी नगरसेवकावर गोळीबार

56Views

जळगाव:

जळगाव येथील भाजपच्या नगरसेविका उषा पाटील यांचे पती आणि माजी नगरसेवक संतोष मोतीलाल पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना सावखेडा शिवारातील आर्यन पार्क भागात आज सकाळी दहा वाजता घडली. संतोष पाटील यांच्या छातीच्या उजव्या बाजूला गोळी लागली असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. संतोष पाटील हे मनसेचे माजी नगरसेवक आहेत. आता त्यांच्या पत्नी उषा पाटील या भाजपकडून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. पाटील यांची सावखेडा शिवारात शेती आहे. ते सोमवारी सकाळी दुचाकीवरून त्यांच्या शेताकडे जात होते. आर्यन पार्कच्या मागच्या बाजूस पोहोचल्यानंतर नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाटील यांची दुचाकी अडवली आणि त्यांच्यावर गोळीबार केला. एक गोळी पाटील यांच्या छातीच्या उजव्या बाजूला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. गोळीबारानंतर हल्लेखोर दुचाकी घटनास्थळी सोडून पसार झाले. हल्लेखोरांनी पाटील यांना जीवे मारण्याच्या उद्देशानेच गोळीबार केला. हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधला होता. तसेच जॅकेट परिधान केले होते, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पाटील यांच्या नातेवाईकांसह समर्थकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. रुग्णालय परिसर आणि हरिविठ्ठल नगर परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण होते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply