News

जामीन मंजूर खडसे बदनामीप्रकरणी दमानियांना.

55Views

रावेर:-

माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या कथित बदनामीप्रकरणी रावेरच्या न्यायालयात सोमवारी (दि. २५) सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया उपस्थित झाल्या होत्या. या प्रकरणात अनुपस्थित राहण्याच्या अंजली दमानिया यांच्या विनंती अर्जावर येथील न्यायालयात आता ११ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, याबाबत फिर्यादी आणि भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी हे प्रकरण लांबवून संशयित आरोपीला त्रास देण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याचा खर्च म्हणून न्यायालयाने पाटील यांना खर्चापोटी एक हजार रुपये दंड देण्याचे आदेश दिले. तसेच पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर दमानिया यांना जामीन मंजूर केला आहे. सोमवारी न्यायालयात दमानिया यांचे वकील अॅड. सुधीर कुलकर्णी आणि अॅड. जे. जी. पाटील यांनी आमदार एकनाथ खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी दमानिया यांच्याविरुद्ध विविध ३१ ठिकाणी अब्रूनुकसानीची प्रकरणे दाखल केली आहेत. या सर्व प्रकरणांची एकत्रित सुनावणी घेण्यात यावी, असा अर्ज मुंबई उच्च न्यायालयात केला असून, त्यावर सुनावणी सुरू असल्याने येथील न्यायालयाने दमानिया यांना याप्रकरणी कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. तसेच दमानिया या कॅन्सर रुग्ण असल्याने त्यांना मुंबईहून येथे मोटारीने यावे लागते. मात्र, फिर्यादी सुनील पाटील यांचे वकील तुषार महाजन यांनी ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. यावर श्रीमती दमानिया यांचा येण्या-जाण्याचा खर्च म्हणून पाटील यांनी ५० हजार रुपये द्यावेत अशी मागणी अॅड. कुलकर्णी यांनी केली. यावर न्यायाधीश आर. एल. राठोड यांनी खर्चापोटी सुनील पाटील यांनी एक हजार रुपये दमानिया यांना देण्याचा आदेश दिला. जळगाव येथील जितेंद्र कांतीलाल शाह यांनी दमानिया यांच्यासाठी जामीन अर्ज सादर करीत पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर दमानिया यांना जामीन मंजूर करण्यात आला. आमदार एकनाथ खडसे यांनी फक्त कार्यकर्त्यांना कामाला लावले असून, त्यांनी अगर भारतीय जनता पक्षाने कुठेही एका ठिकाणी बदनामीचा खटला चालवल्यास आपण नियमितपणे उपस्थित राहू, असा युक्तिवाद दमानिया यांनी केला.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply