News

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटलांची आत्महत्या

59Views
 औरंगाबाद :-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅंकचे अध्यक्ष सुरेश दयाराम पाटील (वय ७९) यांनी समर्थनगर येथील निवासस्थानी विषप्राशन करून आत्महत्या केली. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान उघडकीस आला. घटनास्थळी सुसाइड नोट सापडली असून त्यांनी मानसिक तणावात हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

सुमारे दहा वर्षांपूर्वी जिल्हा बँकेचे सदस्य असलेल्या अॅड. सदाशिव गायके यांनी हवेत गोळीबार केला होता. या प्रकरणासंदर्भात सुरेश पाटील, बँकेचे माजी उपाध्यक्ष जयराम सांळुके, रायभान मदगे हे जिल्हा कोर्टात गेले होते. रविवारी केलेला प्रवास, दगदगीमुळे प्रकृती बरी वाटत नाही, असे पाटील यांनी सांळुके यांना सांगून दुपारी सव्वा वाजता निवासस्थानी परतले. दुपारी दीडच्या सुमारास ते नियमित जेवण करत असत, पण, ते खोलीतून बाहेर आले नाहीत, शिवाय प्रतिसाद मिळत नसल्याने नातू निशांत व इतरांनी खोलीचे दार तोडले असता सुरेश पाटील हे निपचित पडल्याचे दिसले. त्यांना समर्थनगरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये ताबडतोब नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्याचवेळी नातेवाईकांनी खोलीची पाहणी केली असता सुसाइड नोट आढळून आल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत एक बाटली, सुसाइड नोट आदी साहित्य ताब्यात घेतले आहे.
पाटील यांच्या मागे पत्नी शकुंतला, मुलगा माजी आमदार नितीन पाटील, सचिन पाटील, मुलगी डॉ. संगीता विनोद शिसोदे, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. आत्महत्येची माहिती समजताच विविध राजकीय पक्षांतील नेत्यांनी पाटील यांच्या निवासस्थानी धाव घेतली. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जडणघडणीत पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. कुशल प्रशासक अशी त्यांची ओळख होती.

मानसिक त्रासामुळे आत्महत्या

घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये अॅड. सदाशिव गायके व इतर काहीजणांची नाव आहेत, त्यांच्याकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख असल्याचे पोलिसांतील सूत्रांनी सांगितले.

आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. सदाशिव गायके यांना ताब्यात घेतले आहे. ‘तीन ते चार जणांनी शस्त्राचा धाक दाखवत सकाळी माझे अपहरण करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी सुरेश पाटील हे त्याच परिसरात होते,’ असा तक्रार अर्ज गायके यांनी वेदांत पोलिसांकडे दिला आहे.

नागद येथे आज अंत्यविधी

सुरेश पाटील यांचे पार्थीव मंगळवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी ९ ते १० यावेळेत समर्थनगर येथील निवासस्थानी, त्यानंतर सकाळी साडे दहा ते साडे अकरा पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत, दुपारी दीड ते अडीच वाजता नागद (ता. कन्नड) येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. सदाशिव गायकेंना अटक

‘तुम्ही सुरेश पाटील, नितीन पाटील आणि जयराम सांळुके याच्या विरोधात तक्रार देत असल्याचे सांगत, कानशिलावर रिव्हॉल्व्हर लावून जिवे मारण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तीने केला होता. या घटनेच्यावेळी सुरेश पाटील आणि जयराम सांळुके यांना पाहिले, असा आरोप सदाशीव गायके यांनी पोलिसामध्ये दिलेल्या तक्रार अर्जात केला आहे. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (२५ फेब्रुवारी) सकाळी सहा ते साडे सहा वाजेच्या दरम्यान कोकणवाडी चौक ते पंचवटीच्या रस्त्यावरून मार्निंग वॉकसाठी जात असताना, एक लाल रंगाची चार चाकी गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली. या गाडीत चार व्यक्ती बसले होते. त्यांनी काही जणांनी कारमध्ये गायके यांना ओढून आत बसविले. गाडीत बसविल्यानंतर यातील एकाने रिव्हॉल्व्हर गायके यांच्या कानशिलावर लावली. ‘तू सुरेश पाटील, नितीन पाटील आणि जयराम सांळुके यांच्या विरोधात केस का करतो? असे सांगून तुला संपवितो अशी धमकी दिली.’ गायके यांनी प्रसंगावधान ठेऊन आरडाओरड केल्यानंतर या ठिकाणी जनार्धन तांबे आणि रमेश तांबे हे धाऊन आले. सदर दोन्ही जण गाडीकडे येत असल्याचे पाहून कारमधील चौघांनी गाडीतून गायके याला बाहेर ढकलेले आणि पंचवटी चौकाकडे गाडी पळविली, असा आरोप गायके यांनी केला आहे.

या घटनेनंतर या ठिकाणाहून पोलिस आयुक्तांशी संपर्क केला. तसेच कंट्रोल रूमलाही माहिती दिली. यानंतर सकाळी ९ वाजेपासून वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते. या प्रकरणात पोलिसांनी सदाशिव गायके यांची तक्रार घेतली असून पोलिस उपनिरिक्षक पाटील यांच्याकडे तक्रार चौकशीसाठी देण्यात आली आहे.

मला कसं जबाबदार धरणार?

जिल्हा बँकेत झालेल्या गैरव्यवहार बाबत मी कोर्टात केस दाखल केली आहे. यात सुरेश पाटील सह रामकृष्ण बाबा पाटील, आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात याचिका दाखल केली आहे. जिल्हा बँकेच्या भरती घोटाळ्यात तसेच अन्य प्रकरणात सुरेश पाटील यांना कोर्टाकडून शिक्षा होण्याची भीती होती. आपल्या कुटूंबातील सदस्यांना वाचविण्यासाठी त्यांनी आत्महत्या केली आहे. कोणीही आत्महत्या केल्यास मला कसे जबाबदार धरणार, असा प्रश्न सदाशीव गायके यांनी उपस्थित केला.

सिडकोतील गायकेंच्या घराला दिले पोलिसांनी संरक्षण
सुरेश पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात सदाशीव गायके यांचे नाव असल्यामुळे गायके यांच्या सिडको येथील घराला बंदोबस्त लावण्याचे आदेश पोलिस विभागाच्या वरिष्ठांनी दिले.

पोलिस ठाण्यातूनच गायकेंना घेतले ताब्यात

सदाशीव गायके हे अपहरण आणि जिवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात तक्रार देण्यासाठी वेदांत नगर पोलिस ठाण्यात आले होते. त्यांची तक्रार घेण्याची कारवाई सुरू होती. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आत्महत्या केल्याची माहिती आल्यानंतर वेदांतनगर पोलिस ठाण्यातच असलेल्या सदाशीव गायके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिस विभागातील सुत्रांनी दिली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply