News

जि.प. सदस्याच्या शाळेची दुरावस्था.

35Views

नागपूर:-

कुही तालुक्यातील मांढळ क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य उपासराव भुते यांच्या दिव्यांग कर्मशाळेची दुरावस्था झाली असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने दिलेल्या आकस्मिक भेटीनंतर ही बाब उघडकीस आली आहे. या भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी भुते यांच्या कर्मशाळेची तपासणी करून अव्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत. जिल्ह्यातील इतर कर्मशाळा व वसतिगृहांचीही विभागाने तपासणी करून विद्यार्थ्यांच्या नावे अनुदान लुटणाऱ्या संस्थाचालकांमागे चौकशीचा ससेमीरा लागणार असल्याची माहिती आहे. यामुळे अनेक दिव्यांग कर्मशाळा व वसतिगृह संचालकांचेही धाबे दणाणले असून त्यांनी जिल्हा परिषदेकडे चकरा मारणे सुरू केल्याची चर्चा सुरू आहे.

मांढळ येथे उपासराव भुते चालवित असलेल्या कर्मशाळेत ४० विद्यार्थ्यांची मान्यता आहे. परंतु, प्रत्यक्षात शाळेत एकही विद्यार्थी नसून वीज, पिण्याचे पाणी व इतर सोयीसुविधांचीही वानवा आहे. ही कर्मशाळा सरकारी रेकॉर्डवर प्राथमिकदृष्ट्या बोगस असल्याचे समाजकल्याण विभागाच्या तपासणीत उघडकीस आले आहे. विद्यार्थ्यांचा तपशील केवळ हजेरी पुस्तिकेवर आहे. दिव्यागांच्या प्रशिक्षणासाठीचे अर्धवट साहित्य एका खोलीत भंगारात ठेवले आहे. यासह इतर अनेक सोयीसुविधांचा अभाव असून, विद्यार्थ्यांच्या नावे अनुदान लाटण्याचा प्रकार सुरू होता. जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुकेशिनी तेलगोटे यांच्यासह पथकाताील अधिकाऱ्यांनी भुते यांच्या कर्मशाळेला आकस्मिक भेट दिली असता तपासणीत प्रचंड भोंगळ कारभार समोर आला.

जिल्ह्यातील अनेक कर्मशाळा व वसतिगृहांमध्ये भुते यांच्या शाळेसारखाच प्रकार चालत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील कर्मशाळा व वसतिगृहांना आकस्मिक भेटी देऊन तपासणीचा कार्यक्रम आखला आहे. याशिवाय भुते यांचे बिंग फुटल्यानंतर जिल्ह्यातील इतर कर्मशाळा व वसतिगृहांना आकस्मिक भेटी देऊन तपासणी करण्याची मागणी सर्वस्तरातून आल्यानंतर समाजकल्याण विभाग ‘दक्ष’ झाला आहे. कारवाईची कुऱ्हाड आपल्यावरही कोसळू नये, यासाठी जिल्ह्यातील कर्मशाळांचे व वसतिगृहांचे संचालक कागदपत्रे घेऊन सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेत हजर झाल्याचे आढळून आले. यात स्वत: भुते यांचा समावेश होता.

१२३ शाळ‌ांना मान्यता

शासनाने १२३ कर्मशाळांना नुकतीच मान्यता दिली. यादीतील शाळांची तपासणी करून सोयीसुविधांनुसार ६० टक्के अनुदान देण्याचा निर्णय आहे़ त्याच वर्गवारीत भुते यांचीही शाळा आहे़ अनुदान देण्यापूर्वी शाळांची स्थिती काय आहे, याचा आधी आढावा घेण्यात येतो. त्यानुषंगाने ३१ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी सुकेशिनी तेलगोटे व त्यांच्या पथकाने भुते यांच्या कर्मशाळेला भेट देताच सत्य परिस्थिती समोर आली.

भुते यांच्यामागील शुक्लकाष्ठ कायम?

आकस्मिक भेटीनंतर भांबावलेले जिल्हा परिषद सदस्य उपासराव भुते यांनी सोमवारी जिल्हा परिषद मुख्यालय गाठले. शाळेच्या दुरावस्थेवर त्यांनी सोमवारी स्पष्टीकरण देणे अपेक्षित होते, असे सांगितले जात आहे. परंतु, त्यांनी स्पष्टीकरणासाठी एक दिवसाची मुदतवाढ मागीतली आहे. मंगळवारी भुते हे स्पष्टीकरण देतील. गेल्या काही महिन्यांपासून भुते यांच्या मागे शुक्लकाष्ठ लागले आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण निंबाळकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. यातील तक्रारदार ग्रामसेविकेने भुते यांनासुद्धा ५० हजार रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला होता. त्यामुळे भुतेसुद्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आले होते. आता परत त्यांच्यामागे चौकशीचे त्रांगडे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply