News

ज्येष्ठ सिने दिग्दर्शक मृणाल सेन यांचे निधन

17Views

कोलकाता:-

माणूस केंद्रस्थानी ठेवून त्याचे दुख, जगण्याचे प्रश्न प्रभावीपणे रुपेरी पडद्यावर मांडून व्यवस्थेला प्रश्न विचारू पाहणारे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचे आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. सेन यांच्या निधनामुळे भारतीय चित्रपटसृष्टीच्या एका युगाचा अंत झाला असल्याची भावना व्यक्त होत आहे. सेन यांच्या निधनावर राजकीय, सास्कृतिक जगतातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.सध्या बांगलादेशमध्ये असणाऱ्या फरीदपूरमध्ये १४ मे १९२३ रोजी त्यांचा जन्म झाला होता. मृणाल सेन यांनी १९५५ मध्ये ‘रात भोर’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यांचा हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर १९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नील आकाशेर नीचे’ या चित्रपटामुळे त्यांची ओळख निर्माण झाली. ‘बाइशे श्रावण’ या चित्रपटामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. मिथुन चक्रवर्ती यांचा पदार्पणाचा चित्रपट असलेल्या ‘मृगया’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. मृणाल सेन यांना २० राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. आंतरराष्ट्रीय जगतात त्यांच्या चित्रपटांची दखल घेण्यात आली. सिनेजगतातील योगदानासाठी त्यांना १९७९ मध्ये नेहरू-सोव्हिएत लँड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सेन यांनी वयाच्या ८० व्या वर्षी २००२ साली ‘अमर भुवान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. पद्मभूषण या नागरी पुरस्काराने आणि चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. सत्तर-ऐशींच्या दशकात सुरू झालेल्या समांतर चित्रपट चळवळीत त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.

विद्यार्थी दशेत असताना डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेच्या सांस्कृतिक आघाडीवर मृणाल सेन सक्रिय होते. मात्र, त्यांनी कधीही डाव्या पक्षाचे सभासदत्व स्विकारले नाही. ‘इप्टा’ या सांस्कृतिक संघटनेत ते सक्रिय होते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply