News

झवेरी बॉम्बस्फोटातील कैद्याचा नागपुरात मृत्यू.

21Views

 नागपूर:-

मुंबईतील झवेरी बाजार व गेटवे ऑफ इंडिया परिसरात बॉम्बस्फोट घडविल्याप्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या कैद्याचा नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. मोहम्मद हनीफ अब्दुल रहीम (वय ५६, रा. सलीम चाळ, मरोळ नाका), असे मृतकाचे नाव आहे.

२५ ऑगस्ट २००३ला मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया व झवेरी बाजार येथे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटात ५४ नागरिकांचा मृत्यू तर २६० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले होते. याप्रकरणात पोलिसांनी अशरत शफीक मोहम्मद अन्सारी (३२), मोहम्मद हनीफ व त्याची फहमीदासह अन्य आरोपींना अटक केली होती. विशेष न्यायालयाने या तीन आरोपींना भादंवि कलम १२०(गुन्हेगारी कट), ३०२(खून), ३०७ (खुनाचा प्रयत्न) व ४२७ (गैरकृत्याने जखमी करणे) याखेरीज ‘पोटा’ कायद्याच्या कलम ३(४), ३(३) व ४(बी) या कलमान्वये दोषी ठरविले होते. शिवाय स्फोटके कायदा, स्फोटक द्रव्ये कायदा व सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्याखालील विविध गुन्ह्यांचा दोषही सिद्ध झाला होता. या स्फोटात तिघांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती. २०१२पासून हनीफ व त्याची पत्नी फहमिदा हे दोघे नागपुरातील मध्यवर्ती कारागृहातील वेगवेगळ्या विशेष सेलमध्ये होते. शनिवारी सायंकाळी हनीफ याची प्रकृती खालावली. कारागृह अधिकऱ्यांनी त्याला मेडिकलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. ह्दयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. सोमवारी शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

दुबईत रचला स्फोटाचा कट

हनीफ व त्याची पत्नी ही लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे हस्तक होते. मुंबईमध्ये बॉम्बस्फोट करण्यासाठी दुबईत दहशतवाद्यांनी कट रचला होता. यासाठी हनीफसह तिघे दुबईला गेले होते. त्यानंतरच मुंबईत एकामागून एक बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते,अशी माहिती त्यावेळी समोर आली होती.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply