News

टीम इंडियाची टोपी पाकिस्तानला झोंबली.

14Views

कराची :-

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रांची वनडेमध्ये सेनेच्या गडद हिरव्या रंगाच्या टोप्या परिधान करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघावर कारवाई करावी अशी मागणी पाकिस्तानने आयसीसीकडे केली आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ खेळात राजकारण आणू पाहतो आहे, असा आरोपदेखील पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना आदरांजली म्हणून भारतीय क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत विशेष टोप्या परिधान केल्या होत्या. त्याशिवाय या सामन्यातील संपूर्ण मानधनही राष्ट्रीय सुरक्षा निधीला दान देण्याचा निर्णयही भारतीय संघाने घेतला.

याबाबत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी म्हणतात, ‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारतीय क्रिकेट संघाने आपल्या नेहमीच्या टोपीऐवजी वेगळी सेनेची टोपी घातली होती हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. आयसीसीचेही या गोष्टीकडे लक्ष आहे का? आम्ही म्हणजेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याकडे लक्ष वेधण्याऐवजी आयसीसीनेच जबाबदारीने या वागणुकीची दखल घेत भारतावर कारवाई करायला हवी’. पाकिस्तानातील मीडियाशी बोलताना कुरेशी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्या रांची वनडेत ऑस्ट्रेलियाने भारतावर ३२ धावांनी मात केली. मालिकेत सध्या तरी भारतीय संघ २-१ असा आघाडीवर आहे.

पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनीही कुरेशी यांची री ओढताना म्हटले आहे की, ‘हे क्रिकेट नव्हे… भारतीय संघाच्या या वागणुकीवर वेळीच आळा घातला नाही तर भारत काश्मीरवर करत असलेला अत्याचाराचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून खेळू. म्हणजे हा सगळाप्रकार जगासमोर येईल’. या मंत्र्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी संपर्क साधून भारतीय संघांने घातलेल्या टोप्यांबाबत आयसीसीकडे कायदेशीर तक्रार नोंदवण्याची विनंती केली आहे.

इंझमामची प्रतिक्रिया नाही

पाकिस्तान निवड समितीचा अध्यक्ष आणि माजी कर्णधार इंझमाम उल हक याने मात्र याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्याला या वादात पडायचे नाही. ‘हे बघा, मी क्रिकेटपटू आहे अन् माझे काम या खेळापुरते आहे. हे सगळे राजकारण अन् त्याबाबतच्या चर्चेत मला खेचू नका. मला त्यात पडायचे नाही. क्रिकेट आणि राजकारण या दोन्ही पैलूंना वेगवेगळे ठेवा’, असे १२० कसोटींचा अनुभव असलेला इंझमाम म्हणाला. दोन्ही देशांत असलेल्या तणावाचा परिणाम वर्ल्डकपमध्ये १६ जूनला रंगणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीवर होईल का? या प्रश्नावर इंझमाम म्हणाला, ‘यावेळी काही वेगळे असेल असे मला वाटत नाही’.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply