News

दहशतवादाविरोधात भारताला पूर्ण सहकार्य करणार: सौदी

50Views

नवी दिल्ली: –

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला जगभरातून पाठिंबा मिळत असताना सौदी अरेबियानंही भारताला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. ‘दहशतवाद हा सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी आम्ही भारताला सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहोत,’ असं आश्वासन सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी आज दिलं.

मोहम्मद बिन सलमान सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सलमान यांनी दहशतवादाच्या मुद्दयावर भाष्य केलं. ‘कट्टरतावाद व दहशतवादासारख्या मुद्द्यावर आम्ही भारताच्या सोबत आहोत. इंटेलिजन्ससह अन्य सर्व प्रकारचं सहकार्य करण्याची आमची तयारी आहे,’ असं सलमान म्हणाले. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा थेट उल्लेख मात्र त्यांनी टाळला.

भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलमान यांचे आभार मानले. ‘दहशतवाद पोसणाऱ्या देशांवर दबाव वाढवणं गरजेचं आहे. दहशतवादी विचारांमुळं तरुण भरकटू नयेत यासाठी ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे. या मुद्द्यावर सौदीचे विचार आमच्याशी जुळतात याचा आनंद आहे. दहशतवादविरोध, सागरी व सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत दोन्ही देशांत सहमती झाली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply