News

धान करपू लागले.

65Views

भंडारा:-

ऑगस्ट महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे चांगले पीक हाती येण्याची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या चिंता दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. सप्टेंबर महिन्याचा उत्तरार्ध सुरू होऊनही पुरेसा पाऊस न आल्यामुळे शेतातील उभे धान पीक करपू लागले आहे. पिके वाचविण्यासाठी तलाव, बोडी व नाल्यांमधून पाणी देताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यात सुमारे १ लाख ८० हजार हेक्टरमध्ये धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. जुलै महिन्यात अधूनमधून आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. ऑगस्ट महिन्यातील पावसाने चांगल्या खरीप हंगामाच्या आशा पल्लवीत केल्या. पिकांना पोषक वातावरण तयार झाले. शेतात धान डौलात उभे झाले. हलके धान तर आता निसवण्याच्या स्थितीत आले आहे. उशिरा पेरणी केलेले धान गर्भावस्थेमध्ये आहे. या पिकांना आता पाण्याची नितांत गरज आहे. परंतु, गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाअभावी जमिनीला भेगा पडत असून धान पिक करपू लागले आहे. पिके वाचविण्यासाठी बोडी, तलाव, लहान मोठ्या नाल्यामधून डिझेलपंपाद्वारे पाणी पुरविले जात आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांकडे या सुविधा नाहीत त्यांना पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे. लवकर पाऊस आला नाही तर उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

उपलब्य आकडेवारीनुसार आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या ८३ टक्के पाऊस झाला आहे. भंडारा आणि पवनी तुमसर तालुक्यात सर्वाधिक ९१ तर साकोली तालुकयात सर्वांत कमी म्हणजे ७४ टक्के पाऊस पडला आहे.

प्रकल्पातील पाणी सोडण्याची मागणी

जिल्ह्यात गोसेखुर्द व बावनथडी या दोन मोठ्या सिंचन प्रकल्पांसह इतर उपसा सिंचन योजना व तलाव आहेत. या प्रकल्पांमध्ये पाण्याचा पुरेसा साठा असून हे पाणी पिकांसाठी सोडण्यात यावे, अशी मागणी होऊ लागली आहे. तुमसर तालुक्यातील सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेचा विज पुरवठा खंडीत केल्याने ही योजना बंद आहे. त्यामुळे या योजनेतून चांदपूर तलावात पाण्याचा विसर्ग थांबला आहे. बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोमवारपासून सोडण्यात आले. तर अन्य मोठ्या तलावांमधून पिकांसाठी तात्काळ पाणी देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

डिझेल पंप लावून अशाप्रकारे पिकांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply