News

धोनीशिवाय विराट सैरभैर.

11Views

 नवी दिल्ली :-

‘धोनी आजही भारताच्या वनडे संघाचा अर्धा कर्णधारच वाटतो. त्याच्याशिवाय विराट सैरभैर वाटतो. जे मैदानात आपण पाहू शकतो’, असे निरीक्षण नोंदवले आहे ते भारताचे माजी कर्णधार बिशन सिंग यांनी. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या मोहाली वनडेत याचा प्रत्यय आला. या वनडे मालिकेतील उर्वरित दोन वनडेंसाठी धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. ‘याबाबत वक्तव्य करणारा मी कुणीच नाही; पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित लढतींसाठी धोनीला विश्रांती का दिली? याचे सगळ्यांप्रमाणे मलाही आश्चर्य वाटले. यष्ट्यांमागून त्याचे उपयुक्त मार्गदर्शन आजही सुरू असते. फलंदाजी, क्षेत्ररक्षण या सगळ्यात त्याच्या शब्दाला आजही महत्व आहे. त्यामुळे तो आजही मर्यादित षटकांच्या संघाचा आजही कर्णधार आहे’, असे बेदी म्हणाले.

राजधानी दिल्लीत ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तांतर्फे ऑस्ट्रेलियन संघासाठी भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यावेळी बेदी यांनी वृत्तसंस्थेकडे आपले मत व्यक्त केले. ‘धोनी आता पूर्वीसारखा तरुण राहिलेला नाही; पण संघाला आजही त्याची आवश्यकता आहे. त्याचा संघावर प्रभाव आहे, त्यामुळे कर्णधार विराटलाही तो संघात हवाहवासा वाटतो. त्याच्याशिवाय विराट सैरभैर वाटतो, जे संघाच्या दृष्टीने योग्य नाही’, असे ७२ वर्षांचे बेदी म्हणाले. ६७ कसोटींत २६६ विकेट त्यांच्या नावावर आहेत.

वर्ल्डकप ३० मेपासून रंगणार आहे अन् भारतीय संघ हकनाक प्रयोगांवर भर देतो आहे, असेही बेदी यांना वाटते. ‘वर्ल्डकपला अजूनही अडीच महिन्यांचा कालावधी आहे. त्याचा विचार करून आता प्रयोग करण्यात काय अर्थ आहे. त्यापेक्षा वर्तमानात जगा. वर्ल्डकपच्या दृष्टीने आपण गेले वर्षभर प्रयोग करत आहोत, जे मला तरी आवडलेले नाही’, असे बेदी म्हणाले.

आयपीएल अडचणीत आणू शकते

‘वर्ल्डकपच्या दृष्टीने आयपीएल अडचणीची ठरू शकते. कुणी जायबंदी होऊ शकते. आपापल्या संघांचे प्रतिनिधित्व करताना खेळाडूंनी शंभर टक्के योगदान देऊ नये, अशी अपेक्षा आपण कसे काय करू शकतो?’, असा सवाल बेदी उपस्थित करतात. ऋषभ पंतच्या ढिसाळ यष्टीरक्षणावरही बेदी यांनी खरमरीत टीका केली. ‘ऋषभ पंत हा उधळलेल्या घोड्यासारखा आहे. त्याला नियंत्रणात ठेवायला हवे. संघाच्या सपोर्ट स्टाफची ही जबाबदारी आहे. ऋषभ पुन्हा, पुन्हा त्याच चुका करतो आहे. निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद हे स्वतः यष्टीरक्षक आहेत. किमान त्यांनी ऋषभशी याबाबत बोलायला हवे’, असे बेंदी यांनी सांगितले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply