News

धोनी-केदारची विजयी भागीदारी.

11Views

हैदराबाद :-

गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यानंतर महेंद्रसिंह धोनी-केदार जाधव जोडीने रचलेल्या १४१ धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर भारताने मालिकेतील पहिल्या वन-डे क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा विकेटनी मात केली. भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला ७ बाद २३६ धावांत रोखले. यानंतर धोनी-केदार जोडीने हुशारीने खेळ करून विजयी लक्ष्य ४८.२ षटकांत ४ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. धोनीने सलग दोन चौकार मारून आपल्या नेहमीच्या शैलीने सामन्याला ‘फिनिशिंग टच’ दिला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली.

उप्पलच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या लढतीत शिखर धवन शून्यावरच माघारी परतला. यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने खेळपट्टीचा अंदाज घेत सावध खेळ केला. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावा जोडल्या. झाम्पाने कोहलीला पायचीत टिपून ही भागीदारी संपुष्टात आणली. कोहलीला मैदानावरील पंचांनी नाबाद ठरविले होते. ऑस्ट्रेलियाने यासाठी लगेचच ‘रिव्ह्यू’ घेतला. त्याचा त्या संघाला फायदा झाला. कोहलीने ४५ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारसह ४४ धावा केल्या. पाठोपाठ रोहित शर्मा आणि अम्बटी रायुडूही माघारी परतला. त्या वेळी भारताची ४ बाद ९९ अशी स्थिती झाली होती.

या स्थितीतून महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधवने भारताला बाहेर काढले. केदारने ६७ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे वन-डेतील पाचवे अर्धशतक ठरले. या जोडीने कुठलाही दबाव न घेता शांतपणे खेळ केला. या जोडीने आपापली अर्धशतके पूर्ण करून १० चेंडू शिल्लक राखून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. धोनीने ७२ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारसह नाबाद ५९, तर केदारने ८७ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारसह नाबाद ८१ धावा केल्या.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजा आणि स्टॉइनिस यांच्या ८७ धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला २३६ धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाच्या ३९.५ षटकांत ६ बाद १७३ धावा झाल्या होत्या. पण कॅरी-कूल्टर नाइल जोडीने सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आणि ऑस्ट्रेलियाला सव्वादोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. स्कोअरबोर्ड : ऑस्ट्रेलिया ७-२३६ (उस्मान ख्वाजा ५०, स्टॉइनिस ३७, ग्लेन मॅक्सवेल ४०, टर्नर २१, कॅरी नाबाद ३६, कूल्टर-नाइल २८, शमी ४४-२, बुमराह ६०-२, कुलदीप ४६-२) पराभूत वि. भारत ४८.२ षटकांत ४ बाद २४०(रोहित शर्मा ३७, विराट ४४, महेंद्रसिंह धोनी ना. ५९, केदार जाधव नाबाद ८१, कूल्टर-नाइल ४६-२, झम्पा ४९-२)

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply