News

नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा मिटेना वाद!

29Views
देवळाली कॅम्प :-
रेल्वेमार्ग सर्वेक्षणावरून लोकसभा व विधानसभेसह सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय नानेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी ग्रामसभेत घेतला आहे. यामुळे उद्या (दि. २३) सकाळी ९ वाजता रेल्वे अधिकारी व ग्रामस्थांसह चर्चा करून यावर तोडगा काढणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी विरुद्ध रेल्वे प्रशासन यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. त्यांच्यातील हे प्रकरण तडीस लावण्यासाठी आपण ग्रामस्थ व अधिकाऱ्यांना समोरासमोर बसून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे खासदार गोडसे यांनी सांगितले. नाशिक-पुणे रेल्वेमार्ग नाशिकरोड रेल्वे स्टेशनपासून सुरू होऊन बेलतगव्हाण-संसरी-शेवगेदारणासह नानेगावातून जात असल्याने हा मार्ग पूर्वीच्या ठरलेल्या मार्गाने न घेता हा नव्याने सर्वेक्षण का, नानेगावच्या भौगोलिक परिस्थिती चौकोनी आहे यातून जर काटकोनात रेल्वेमार्ग गेल्यास अनेक शेतकरी भूमिहीन होतील. या प्रकल्पामुळे गाव दोन भागात विभागले जाणार असून, सर्वाधिक क्षेत्र नानेगावचे जाणार आहे. रेल्वेमार्गाच्या कडेला द्राक्षबागा असून, हा प्रकल्प रद्द करण्यासाठी शेवगे दारणा, संसरी, बेलतगव्हाण, वडगाव पिंगळा या गावांतील नागरिकांनी नानेगाव मारुती मंदिर येथे आज (दि. २२) सकाळी ९ वा उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक 

नानेगावसह परिसरातील शेतकऱ्यांना या रेल्वेमार्गाबाबत कुठलीही पूर्वसूचना न देता हे सर्वेक्षण पूर्ण केले गेले कसे याबाबत जाब विचारण्यासाठी नानेगाव ग्रामस्थ आज (दि. २२) जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांची भेट घेणार आहेत. आपल्या शेतातून जाणारा हा प्रकल्प होऊ देऊ नये, अशी मागणीदेखील करणार असल्याची माहिती माजी सरपंच ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply