News

पंजाबमधील अमृतसर लोकसभा मतदारसंघातून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग निवडणूक लढणार?

10Views

अमृतसर:

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच जागावाटप आणि उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याच्या कामाला वेग आला आहे. मोदी-शहा जोडीला पराभूत करण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली असून पक्षाच्या दिग्गजांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची रणनीती आखली आहे. याचाच भाग म्हणून पंजाबमधील अमृतसर लोकसभा मतदारसंघातून माजी पंतप्रधान मनमोहन सिं यांच्या नावावर विचार सुरू आहे. तसं झाल्यास भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड व प्रभारी आशा कुमार या तिघांनीही मनमोहन यांना अमृतसरमधून निवडणूक लढविण्याची गळ घातली आहे. मनमोहन यांनी अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. मात्र, पक्ष त्यांच्या नावाचा गांभीर्यानं विचार करत आहे. मनमोहन सिंग हे एक विश्वासार्ह आणि देशव्यापी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचं नाव आणि कामच मत मिळविण्यासाठी पुरेसं आहे. मनमोहन सिंग उमेदवार असणं हे अमृतसरच्या जनतेसाठी अभिमानाची गोष्ट असेल,’ असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे.

मागील निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी अमृतसरमधून निवडणूक लढवली होती. मात्र, काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यावेळी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या नेत्यांनी जेटली यांना विजय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. काँग्रेसचे नेतेही त्याच पद्धतीनं मनमोहन सिंग यांची मनधरणी करत असल्याचं समजतं. मनमोहन सिंग हे अमृतसरमधून लढण्यास तयार झाल्यास त्यांच्या विरोधात भाजप कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply