News

पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा नाही; गडकरीचं पुन्हा स्पष्टीकरण

15Views

नवी दिल्ली :

‘आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्याची माझी कोणतीही महत्त्वाकांक्षा नसून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही मला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून सादर करण्याची योजना नाही,’ असे स्पष्टीकरण केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिले. राजकारण आणि कामामध्ये ‘आकडेमोड’ करायची सवय नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास गडकरी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसून अथकपणे काम करण्यावरच आपण लक्ष केंद्रित केल्याचे गडकरी म्हणाले. ‘मी याबाबत कोणतीच आकडेमोड केलेली नाही. त्याचप्रमाणे, राजकारण आणि काम करताना स्वत:साठी लक्ष्यही निश्चित केले नाही. मी जशी वाट सापडेल, तसा जातो; जे काम दिसते ते करतो; आपल्या देशासाठी सर्वोत्तम ते करण्यावर विश्वास ठेवतो,’ असे गडकरी यांनी सांगितले. माझ्यासाठी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी देश हाच सर्वोच्च स्थानी असल्याचेही त्यांनी नमूद केले. मी स्वप्ने पाहात नाही. त्याचप्रमाणे, कोणाकडे तरी जाऊन स्वत:चे ‘लॉबिंग’ही करत नाही. त्यामुळे लोक माझ्याविषयी काय चर्चा करतात, याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही, असे गडकरी म्हणाले.

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे उत्तम कामगिरी करत असून पक्ष त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. आम्ही मागील पाच वर्षांत जी कामगिरी केली आहे, ती लक्षात घेता मागील निवडणुकीपेक्षा भाजपला अधिक जागा मिळतील, असा अंदाज गडकरी यांनी वर्तवला. विरोधी पक्षांनी लोकसभेसाठी केलेली महाआघाडी म्हणजे ‘महाभेसळ’ असल्याची टीकाही त्यांनी केली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply