News

पंतप्रधानांनी ट्विटर हँडलवरील नावात बदल करत ते ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे केले आहे.

5Views

नवी दिल्ली :-

गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘चायवाल’ या शब्दाचा पुरेपूर वापर केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने (भाजप) २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘चौकीदार’ हा शब्द अधोरेखित केला आहे. देशभरातील सभांमध्ये स्वत:चा ‘देश का चौकीदार’ असा उल्लेख करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (शनिवार) ‘मैं भी चौकीदार’ हा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर आता पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर हँडलवरील नावात बदल करत ते ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे केले आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनीही पंतप्रधानांचे अनुकरण केले आहे.

अमित शहांसह अनेक मोठे नेते ‘चौकीदार’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी ‘मैं भी चौकीदार’ हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर ट्विटर हँडलवरील नाव बदलल्याचे दिसत आहे. तथापि, फेसबुक, इंस्टाग्रामवर अजूनही नरेंद्र मोदी असेच नाव आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबरच अध्यक्ष अमित शहा, रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी देखील आपल्या नावापुढे ‘चौकीदार’ असे विशेषण लावले आहे.

या व्यतिरिक्त जेपी नड्डा, रमन सिंह, पूनम महाजन यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी आपल्या नावापुढे चौकीदार जोडले आहे.

भाजपने प्रसिद्ध केला होता व्हिडिओ

लोकसभा निवडणुकीत्या प्रचारासाठी भाजपने एक व्हिडिओ लाँच केला होता. ३ मिनिटे ४५ सेकंदाच्या त्या व्हिडिओमध्ये ‘मैं भी चौकीदार’ हा व्हिडिओ मुख्य होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चौर है’ असा पंतप्रधानांवर वार केल्यानंतर पंतप्रधान एकटेच चौकीदार नाहीत असे भाजपने म्हटले होते. जो जो भ्रष्टाचाराविरुद्ध लढतो, तो तो चौकीदार आहे असे पंतप्रधानांनी म्हटले होते. मोदी यांच्या ट्विटनंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी ‘#मैंभीचौकीदार’चा प्रयोग करत ट्विट केले. यानंतर मैं भी चौकीदार हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आला.

भाजपच्या मैं भी चौकीदार या व्हिडिओवर काँग्रेसने टीकास्त्र सोडले होते. काल (शनिवार) राहुल गांधी यांनी एक फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. पंतप्रधान मोदींचे हे बचावात्मक ट्विट आहे, असे म्हणत, आज तुम्ही स्वत:ला दोषी समजत आहात का?, असा प्रश्न राहुल यांनी विचारला होता. राहुल यांनी पोस्ट केलेल्या फोटोत पंतप्रधान मोदी यांच्यासह इतर लोकांचे फोटोही आहेत. यात नीरव मोदी, मेहुल चौक्सी, विजय मल्लाया यांचे फोटो आहेत. शिवाय फोटोत गौतम अदानी आणि अनिल अंबानी यांचेही फोटो आहेत.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply