News

पत्रकारांना लोकसहभागातून वैद्यकीय विमा कवच

25Views

कोल्हापूर:-

‘कोल्हापुरातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय विमा रूपाने सुरक्षाकवच निर्माण करण्यासाठी प्रेस क्लबने पुढाकार घ्यावा. लोकसहभागातून वैद्यकीय विमा योजना राबविताना त्यांच्या स्वप्नातील घराचा प्रश्न मार्गी लावला जाईल,’ अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली.

कोल्हापूर प्रेस क्लबच्याव तीने शाहू स्मारक भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार दिन व उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे, तर प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार भारतकुमार राऊत उपस्थित होते. आद्य पत्रकार ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते मुद्रित माध्यमातील उत्कृष्ट छायाचित्रकार अर्जुन टाकळकर, पत्रकार सुनील पाटील, इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे पत्रकार विजय केसरकर, संदीप राजगोळकर, कॅमेरामन अभिजित पाटील यांचा राजर्षी शाहू ग्रंथ, पाच हजार रुपये व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच संपर्क अॅडव्हर्टायझर्सचे सुधीर शिरोडकर, मोहन कुलकर्णी, परीक्षक डॉ. शिवाजी जाधव, विजय टिपुगडे, मिलिंद यादव यांचा ‘सम्राट शिवाजी’ पुस्तक देऊन गौरव केला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘कोल्हापुरात लवकरच परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प हाती घेतला असून यामध्ये ५० घरे पत्रकार आणि आजी-माजी सैनिकांसाठी राखीव ठेवण्याचा मानस आहे. राज्य सरकारने जनतेच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घेतली असून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत गेल्या साडेचार वर्षात १,१०० कोटी रुपये निधी दिला असून कोल्हापुरात ५० कोटी देण्यात आले आहेत.’

महापौर मोरे म्हणाल्या, ‘लोकशाहीत पत्रकारांचे काम अत्यंत मोलाचे असून पत्रकार समाजहिताचे आणि समाजजागृतीचे महत्त्वपूर्ण काम करतात. आज माध्यमांमध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झाली असून या स्पर्धेच्या युगात अधिक सक्षमतेने उभे राहण्यासाठी नवनव्या गोष्टी आत्मसात कराव्यात, तसेच आधुनिकता आणि तंत्रज्ञानाचाही अवलंब करावा.’

ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत म्हणाले, ‘पत्रकारदिनी दुर्जनांना साथ देणार नाही, अशी शपथ घेताना आपली लेखनी व कॅमेऱ्याद्वारे समाजाचे चौकीदार बनावे. निद्रिस्त समाजाला जागे करण्यासाठी पत्रकारांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही क्षेत्रापेक्षा जनसंपर्क माध्यमात वेगाने प्रगती होत असून माध्यमांना उज्ज्वल भविष्य आहे. बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक यांच्यासह अन्य महापुरुषाच्या पत्रकारितेचा वारसा सांगताना आपल्यामध्ये तेवढी प्रगल्भता आहे का?, असा स्वत:ला प्रश्न विचारून अशी प्रगल्भता असेल तर समाजाच्या जाणिवांचा चौकदार बनू शकतो, त्यासाठी प्रभळ इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.’

पुरस्कार गौरव समारंभास निवासी उपजिल्हाधकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्याध्यक्ष सदानंद पाटील, सचिव बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध वृत्तपत्रांचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते. प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष समीर मुजावर यांनी आभार मानले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply