News

पाकिस्तानला वर्ल्डकपमधून बहिष्कृत करणे कठीण.

30Views

नवी दिल्ली :-

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानशी कोणत्याही स्तरावर खेळू नका, अशी लोकभावना तयार होऊ लागली आहे. आगामी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानशी खेळू नये, असेही मत व्यक्त केले जाऊ लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला या स्पर्धेतून बहिष्कृत करा, अशा आशयाचे पत्र बीसीसीआयकडून आयसीसीला पाठवले जाईल, असे बोलले जात असले तरी असे कोणतेही पत्र लिहिले गेलेले नाही. जरी असे पाऊल उचलले गेले तरी आयसीसी त्याला थारा देणार नाही, अशीच शक्यता आहे, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

पुलवामातील हल्ल्यात भारताचे ४० पेक्षा अधिक जवान हुतात्मा झाले. त्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानातील संबंध पुन्हा एकदा ताणले गेले आहेत.

दिल्लीत होणाऱ्या वर्ल्डकप नेमबाजीसाठीही पाकिस्तानच्या नेमबाजांना व्हिसा मिळाला नाही. आता तर क्रिकेट वर्ल्डकपमध्येही भारताने पाकिस्तानवर बहिष्कार टाकावा, अशी मागणी केली जात आहे. आयसीसीच्या दुबई येथील बैठकीत या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या मते अशा बहिष्काराचे पाऊल हे घटनात्मक नाही किंवा वर्ल्डकपसंदर्भात जे करार झाले आहेत त्यातही अशा गोष्टी नाहीत. उलट आयसीसीच्या घटनेनुसार जे देश पात्र आहेत, त्यांना आयसीसीच्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अधिकार आहे.

आता यासंदर्भात बीसीसीआयच्या प्रशासक समितीचे सदस्य, विनोद राय आणि डायना एडलजी यांच्यात बैठक होऊन त्यात हा मुद्दा चर्चिला जाणार आहे. खरे तर या बैठकीत उत्तराखंड क्रिकेटमधील अनेक संघटनांच्या मुद्द्यावर चर्चा होणार होती पण त्यावर आता भारत-पाक क्रिकेटचे सावट असेल.

या अधिकाऱ्याने सांगितले की, जरी बीसीसीआयने पाकवरील बहिष्कारासाठी आयसीसीला पत्र लिहिले आणि आयसीसीने आपल्या सदस्यांसमोर हे पत्र ठेवले तरी त्याला त्या देशांचा पाठिंबा मिळणे कठीण आहे. किंबहुना, आपल्याला २०२१ची चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच २०२३ची वर्ल्डकप स्पर्धा आयोजित करण्याच्या अधिकारावरही पाणी फिरवावे लागेल.

हरभजनसिंग आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी पाकिस्तानवर बहिष्कार घालावा अशी मागणी केली होती.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply