News

पाकिस्तान स्वत:ला ‘नयी सोच’ असलेला ‘नया पाकिस्तान’ समजत असेल, तर त्याने कामगिरीतही नवेपण दाखवाव.

8Views

नवी दिल्ली :-

आश्वासने देऊन देखील पाकिस्तान दहशतवादाविरोधात कोणतीही कारवाई करत नसल्याचा थेट आरोप करतानाच पाकिस्तान स्वत:ला ‘नयी सोच’ असलेला ‘नया पाकिस्तान’ समजत असेल, तर त्याने दहशतवादी संघटना आणि सीमेपलीकडील दहशतवादी कारवायांवर ‘नया अॅक्शन’ घेत कारवाई केली पाहिजे, असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी पाकिस्तानला केले आहे. पाकिस्तान सतत खोटे बोलत असून त्याने भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचे म्हणणे मान्य करत दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई केली पाहिजे असेही रवीश कुमार म्हणाले.

पुलवामा हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात नाही हे पाकिस्तानचे म्हणणे खेदजनक असून, पाकिस्तान ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा बचाव करत आहे का, असा सवालही रवीश कुमार यांनी विचारला आहे. पाकिस्तानने आपल्या भूमीवरील दहशतवादाविरोधात विश्वासार्ह, सिद्ध करता येईल अशी आणि सातत्यपूर्ण कारवाई केली पाहिजे असेही रवीश कुमार म्हणाले.

पाकिस्तानने एफ-१६ विमानांचा वापर केला याचे प्रत्यक्षदर्शी पुरावे, तसेच इलेक्ट्रॉनिक पुरावेही उपलब्ध आहेत. त्यांपैकी एक एफ-१६ विमान भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी पाडले आहे. पाकिस्तानने एफ-१६ विमानांचा केलेला वापर हा नियमांनुसार केला गेला का, याची अमेरिकेने चौकशी करावी अशी मागणी भारताने अमेरिकेकडे केली असल्याचेही ते म्हणाले.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने पुलवामा हल्ल्यासाठी ‘जैश-ए-मोहम्मद’ला जबाबदार धरले आहे. पाकिस्तानने आमराम क्षेपणास्त्राचा प्रयोग केल्याचे पुरावे भारताकडे आहेत. पाकिस्ताने भारतीय हवाई दलाची दुसरेही विमान पाडले असा पाकिस्तानचा दावा आहे. मात्र, याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल, तर त्याने ते आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना का दिले नाही, असा सवालही रवीश कुमार यांनी केला आहे.

पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचे सांगत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडल्याचेही रवीश कुमार म्हणाले. भारताकडे हवाई हल्ल्याबाबत पूर्ण पारदर्शकता आहे. भारताने पाकिस्तानातील जैशच्या तळांवर केलेली विनालष्करी कारवाई यशस्वी झाली असून पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जग भारताच्या बाजूने उभे राहिल्याचेही ते म्हणाले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply