News

पुजाराला नववर्ष भेट, करारात बढतीचे संकेत

12Views

नवी दिल्ली :-

ऑस्ट्रेलियातील जबरदस्त कामगिरीमुळे भारताचा आघाडीचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला भारतीय क्रिकेट बोर्डाने मध्यवर्ती कराराच्या अ+ श्रेणीत समाविष्ट करण्याचा विचार सुरू केला आहे. या श्रेणीतील खेळाडूंना ७ कोटी इतके मानधन मिळते. पुजाराने ऑस्ट्रेलियातील मालिकेत तीन शतकांसह ५२१ धावांचा रतीब टाकला आहे आणि त्यासाठी बीसीसीआयने नियम शिथिल करत त्याला बढती देता येईल का, याची चाचपणी सुरू केली आहे.

सध्या पुजारा अ श्रेणीत आहे. पण पुजाराच्या दमदार कामगिरीमुळे भारताला या मालिकेत विजय मिळविण्याची नामी संधी चालून आल्यामुळे बीसीसीआयकडून त्याला या कामगिरीची पोचपावती दिली जाऊ शकते.

गेल्या वर्षी मंजूर झालेल्या सुधारित मानधन आराखड्यानुसार अ+श्रेणीसाठी ७ कोटी खेळाडूला मिळणार आहेत तर अ श्रेणीतील खेळाडूला ५ कोटी निश्चित करण्यात आले आहेत. पुजारा आता अ श्रेणीतून अ+ श्रेणीत गेल्यास त्यालाही सात कोटींचे मानधन मिळू शकते. ब आणि क श्रेणीतील खेळाडूंना अनुक्रमे ३ आणि १ कोटी इतके मानधन मिळते.

अ+ श्रेणीत कर्णधार विराट कोहलीसह रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन यांचा समावेश आहे.

यासंदर्भात बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय हे संघव्यवस्थापन तसेच निवड समिती प्रमुखांशी चर्चा करून करारासंदर्भातील नियम शिथिल करता येतील का याबाबत चाचपणी करत आहेत. कसोटीत चांगली कामगिरी केलीत तर त्याबद्दल अशी भेट मिळेल हा संदेश उदयोन्मुख क्रिकेटपटूंना देण्याचाही यामागे उद्देश आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply