News

पुणे लोकसभा उमेदवारीचा निर्णय राहुल गांधी घेणार.

12Views

 पुणे :-

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या छाननी समितीमध्ये पुण्यातील पाच नावांबाबत चर्चा झाली असून, त्यातून एका नावावर शिक्कामोर्तब करण्याची जबाबदारी ‘सेंट्रल इलेक्शन कमिटी’मध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीवर सोपविण्यात आली आहे. गांधी आणि समितीतील सदस्य पाच नावांबाबत चर्चा करून त्याबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहेत. खासदार संजय काकडे, ‘शेकाप’चे प्रवीण गायकवाड, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड आणि महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांच्या नावांचा छाननी समितीमध्ये विचार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुण्यातील काँग्रेसच्या उमेदवारीचा प्रश्न दिवसेंदिवस किचकट बनल्याचे चित्र सध्याच्या हालचालींवरून दिसत आहे. शहर काँग्रेसमधील जोशी, छाजेड आणि शिंदे यांच्याकडून उमेदवारी मागण्यात आली आहे. संजय काकडे आणि गायकवाड यांनीही तिकिटासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. जातीय समीकरणे, बदलेल्या राजकीय स्थितीचा फायदा होण्याचा दावा करून पुण्याची लोकसभा जिंकण्याचे मनसुबे या उमेदवारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शहर आणि प्रदेश पातळीवर उमेदवारांमध्ये एकमत न झाल्याने याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाकडे सोपविण्यात आला आहे. त्यानुसार दिल्ली येथे झालेल्या छाननी समितीच्या बैठकीत या नावांचीही विचार झाला असून, अंतिम निर्णयाचा चेंडू हा गांधी यांच्या कोर्टात ढकलण्यात आला आहे.

जागा काँग्रेसची; वरचष्मा ‘राष्ट्रवादी’चा

पुण्यातील जागा काँग्रेसच्या वाट्याला असली तरी या ठिकाणी उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासात घेऊन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेल्या नगरसेवकांचा विचार करता काँग्रेसपेक्षा ‘राष्ट्रवादी’ची परिस्थिती चांगली असल्याचे दर्शविते. त्यामुळे उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस कोणाच्या पारड्यात चेंडू टाकणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

उमेदवारीवरून कोणाचा काय दावा…

‘काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्या’

‘कोणालाही उमेदवारी द्या, त्याचे एकदिलाने काम करू. मात्र, उमेदवारी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यालाच मिळाली पाहिजे,’ असा दावा जोशी, छाजेड आणि शिंदे यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यामुळे काकडे आणि गायकवाड यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधून विरोध करण्यात येत असल्याचे चित्र आहे.

संजय काकडेंची जातीय समीकरणे

खासदार संजय काकडे यांच्याकडून जातीय समीकरणे मांडण्यात येत असून, भाजपमधील अंतर्गत विरोधाचा फायदा त्यांना होणार असल्याचा त्यांचा दावा आहे.

गायकवाड यांची थेट उमेदवारीची मागणी

गेल्या अनेक वर्षांत सामाजिक क्षेत्रात काम न करणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आली नसल्याचा दावा करून गायकवाड यांनी उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. महाराष्ट्राचे प्रभारी आणि लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचीही गायकवाड यांनी भेट घेतली असून, थेट उमेदवारी द्यावी, अशी मागणी केल्याचे समजते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply