News

पुण्याची जागा काॅंग्रेसकडेच : राष्ट्रवादीचे नेते आज निकाल देणार

12Views

पुणे :-

पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या चारही जागांवर राष्ट्रवादी काॅंग्रेस कसा काय दावा करू शकेल? त्यामुळे पुण्याची जागा पक्षाला मागता येणार नाही. त्याचा फैसला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या आजच्या मुंबईतील बैठकीत होईल, अशी माहिती पक्षातील अतिवरिष्ठ सूत्रांनी `सरकारनामा`ला दिली.

पुणे लोकसभेच्या जागेबाबात राष्ट्रवादीकडून अद्याप आग्रह सोडला नसल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात सांगितल्याने या विषयावरील चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे काॅंग्रेसची मंडळीही बुचकळ्यात पडली आहेत. मात्र याबाबत राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाचे वरिष्ठ नेते ही जागा मागणार नसल्याचे आज स्पष्ट करून हा गोंधळ संपविणार आहेत.

पुणे जिल्ह्यात लोकसभेच्या चार जागा आहेत. त्यापैकी बारामती, मावळ आणि शिरूर तीन जागा राष्ट्रवादीकडे आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रातही पुण्यासह, सांगली आणि सोलापूर अशा केवळ तीनच जागा काँग्रेसकडे आहेत. त्यामुळे पुण्याची जागा राष्ट्रवादीला मागणे कितपत सयुक्तिक आहे, असाही प्रश्न पक्षांतर्गत उपस्थित केला गेला असल्याचे समजते. मात्र पुण्याच्या जागेची मागणी न करता काँग्रेसकडून आग्रही मागणी असलेली नगरची जागा राष्ट्रवादी सोडणार नसल्याचेही या सूत्रांनी सांगितले. नगरच्या जागेसाठी राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार असल्याचा दावाही केला गेला.

काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीतील जागावाटपाचे सूत्र तयार झाले असून दोन्ही पक्ष लोकसभेच्या प्रत्येकी २४ जागा लढविणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत खल होणार आहे. आपापल्या कोट्यातील जागा मित्र पक्षांना देण्याचे धोरण दोन्ही पक्षांनी ठरविल्याचे सांगण्यात आले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply