nagpurruralNews

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रीडा क्षेत्रातील संबंध तोडावे.

11Views

नागपूर :-

स्टार अपेक्स,स्टाफ न्यूज:-

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रीडा क्षेत्रातील संबंध तोडावे किवा पाकिस्तान विरुद्ध खेळत त्यांना खेळाच्या मैदानावर पराभूत करावे अशा भावना अनेक ज्येष्ठ क्रीडापटूंनी व्यक्त केल्यानंतर भारताचा ऑलिम्पियन जलतरणपटू वीरधवल खाडेने मात्र, पाकिस्तानशी संबंध तोडण्याच्या निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. एकीकडे या हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरोधी लाट असताना भारत सरकारने या काळात देशात झालेल्या शुटींग विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा नाकारण्याचा निर्णय अगदी योग्यच असल्याचे वीरधवल खाडेने स्पष्ट केले.

कामठी मार्गावरील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये अद्ययावत सोयी सुविधांना सज्ज अशा जलतरण केंद्राचे वीरधवल खाडेच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. उद्घाटनानंतर पत्रकारांशी वीरधवलने संवाद साधला.

यावेळी बोलतांना वीरधवल म्हणाला, पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी शुटर्स व्हिसा केंद्र सरकारने नाकारला. हा भारत सरकारचा योग्य निर्णय आहे. या हल्ल्यानंतर जगातील प्रत्येक देशाने पाकिस्तानवर टीका केली. या दहशतवादी कारवाया थांबवण्याची मागणी केली. या काळात भारतानेही पाकिस्तानी खेळाडूंचा व्हिसा नाकारण्याचा योग्य निर्णय घेतल्याचे त्याने स्पष्ट केले. दरम्यान असे असले तरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाने भारतात कुठल्याही खेळाच्या स्पर्धा आयोजनाचे हक्क भारताकडून काढून घेतले. हा निर्णय अत्यंत खेदजनक आहे. एकीकडे दहशतावादाच्या विरोधात भारताला समर्थन देताना दुसरीकडे अशी बाब होणे हे अत्यंत दुर्देवी असल्याचे वीरधवल म्हणाला.

जलतरण या खेळाची देशातील स्थितीबद्दल वीरधवल म्हणाला, जलतरण या खेळाला लागणारे वातावरण व संस्कृती आपल्याकडे नाही. निराशेची बाब म्हणजे शासनाच्या पातळीवरही या खेळाची फारशी दखल घेण्यात येत नाही. अलीकडच्या काळात शालेय व महाविद्यालयीन पातळीवर स्पर्धा होताना दिसतात. मात्र, शालेय पातळीनंतर अत्यंत कमी जलतरणपटू या खेळावर पूर्ण वेळ लक्ष देतात. ही खेळाच्या विकासाच्या दृष्टीने फारशी समाधानकारक बाब नाही. हा खेळ खेळण्यामागचा आणखी एक उद्देश म्हणजे राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केल्यानंतर दहावी व बारावीच्या परीक्षेत मिळणारे त्याबद्दलचे गुण इतकेच अनेकदा खेळाडूंचे लक्ष्य असते. त्यामुळे हा खेळ अजूनही भारतात रुजलेला नाही. तर उन्हाळा आला म्हणून स्विमींग हा खेळ स्वीकारतात, अशी खंतही त्याने व्यक्त केली. या खेळात खरोखरच पुढे जायचे असेल तर या खेळाबद्दल असलेली मानसिकता बदलणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच पालकांनीही या खेळात मुलांनी करिअर करावे, पुढे जावे असे प्रोत्साहन देणे अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगण्यास वीरधवल विसरला नाही. भारतात जलतरण या खेळाला दर्जेदार सोयी सुविधांबरोबरच प्रशिक्षण मिळाले तर विदेशात जसे जलतरणपटू तयार होतात त्याच दर्जाचे आपल्याकडे तयार होतील असा विश्वासही वीरधवलने व्यक्त केला. खेलो इंडिया हा उपक्रमाची स्तुती करताना हा उपक्रम उत्तम असल्याचे सांगितले. मात्र, यात विजयी होणाऱ्या खेळाडूंना बक्षिसांच्या रुपात मिळणारी स्कॉलरशीप तत्काळ प्रदान करावी असे मत त्याने व्यक्त केले.

टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीबद्दल बोलताना वीरधवल म्हणाला, सिंगापूर येथे २० ते २४ मार्च दरम्यान होणाऱ्या स्पर्धेची तयारी बंगळूरू येथील अकादमीत सुरू आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र होण्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वोकृष्ट जलतरणपटूंसोबत सराव करावा लागतो. मात्र, दुर्देवाने देशात तसेच जलतरणपटू कमी आहे. दरम्यान ऑलिम्पिकपूर्वी सहा स्पर्धा होणार असल्याने त्यात चांगली कामगिरी करण्याचे लक्ष्य असल्याचेही वीरधवलने स्पष्ट केले.

जलतरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर शाळेच्या संचालिका तुलिका केडीया, उपाध्यक्ष अजय मनसुखानी, शाळेचे प्राचार्य गुरप्रीत भांबरा आदी उपस्थित होते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply