News

पोलिस निरीक्षकांच्या बदलीविरोधात रोष व्यक्त झाला.

45Views

अकोला:-

अवैध दारू वाहतुकीवर कारवाई केल्यावरून पोलिस निरीक्षकांच्या बदलीविरोधात रोष व्यक्त झाला. त्याला प्रशासकीय सोपस्कारात बसविण्यात आल्याने वाद निवळला. युती-आघाडीवरून राजकीय वातावरण तापलेले असताना पुलवामा हल्ल्यातील शहिदांसाठी सारेच एकत्र आले. पाकिस्ताविरुद्ध संताप व्यक्त केला.

फेब्रुवारी महिन्याची सुरुवात अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी झाली. सर्वप्रथम पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांची बदली दहशतवादविरोधी पथकात झाल्याने सर्वांना धक्का बसला. अळसपुरे जिल्ह्यातील ‘सिंघम’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कारवाया धडाकेबाज असायच्या. अशातच एका मद्यसम्राटाच्या अवैध दारू वाहतुकीवर कारवाई केल्याने बदली झाल्याची चर्चा होती. पोलिस अधीक्षकांनी हे कारण नाकारत प्रशासकीय सोपस्कार दाखविले. लगोलग इतरही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने रोष शांत झाला.

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर महसूल खात्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांच्यासुद्धा जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या. सोबतच बऱ्याच कारणांनी चर्चेत राहिलेले जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची बीडच्या जिल्हाधिकारीपदी मुदतपूर्व बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असणारे जितेंद्र पापळकर अकोल्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांनी लोकसभेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या. मतदार नोंदणी करण्याकरिता मोहीम अधिक तीव्र केली. सोबतच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमार्फत १ लाख १३ हजार शेतकरी कुटुंबांना लाभ होणार असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालेले आयुष प्रसाद व मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनीसुद्धा कामाचा सपाटा लावल्याने बरीच प्रलंबित कामे पूर्णत्वास जात असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे.

लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्याने प्रत्येक राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. शिवसेना-भाजपची युती झाल्याने ‘कही खुशी कही गम’चा माहौल आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सर्व हिशेब चुकते केले जातील, असे सर्वत्र असंतुष्ट गटांकडून बोलले जात आहे. वंचित आघाडीशी युती न झाल्याने काँग्रेसमधील इच्छुक आनंदात आहेत. त्याहूनही आनंदी भाजप नेते आहेत. कारण काँग्रेस-भारिप बहुजन महासंघाची आघाडी न होणे हे प्रत्येक वेळी भाजपला फायदेशीर ठरले आहे.

अकोला महानगरपालिका कायमच चर्चेत असते. शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांसमोरच सभागृहात ठिय्या आंदोलन केल्याने राजेश मिश्रा व गजानन चौहान या दोन शिवसेनेच्या नगरसेवकांना निलंबित करण्यात आले. अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत या दोन्ही नगरसेवकांनी महापौरांवर प्रश्नांची सरबती केली. संतापलेल्या महापौरांनी ही निलंबनाची कारवाई केल्याने मनपा वर्तुळातील राजकीय वातावरण तापले.
यंदा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सुवर्ण जयंती वर्ष असल्याने विद्यापीठात विविध उपक्रम राबविले जात आहेत. अशातच कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाला. मुनगंटीवार यांनी १५१ कोटी रुपये कृषी विद्यापीठाला शासनाकडून देण्याची घोषणाही केली. खासदार संजय धोत्रे यांनी दोन दिवसीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन जिल्हा सरकारी रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे केले होते. जिल्हाभरातून आलेल्या २५ हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी व उपचार याप्रसंगी विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.

मुर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पोही व रोहणा या उमा नदीवरील प्रकल्पामुळे प्रकल्पग्रस्तांचे हाल सुरू आहेत. याच्या निषेधात मुर्तिजापूर तहसील कार्यालयाजवळ गावकऱ्यांनी आंदोलन पुकारले. अनेकांची प्रकृती खालावल्याने उपोषण स्थगित करण्यात आले. उन्हाळ्याची चाहुल लागल्याने कापशी तलावावर विदेशी पक्ष्यांची गर्दी पहायला मिळत आहे. अकोल्यातील जावेद जकारिया यांनी ‘ईस्लाम परिचय व मशीद दर्शन’ असा आगळा-वेगळा उपक्रम आयोजित करून राष्ट्रीय एकोप्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले. मशिदीबद्दल कुतुहल असणाऱ्या शेकडो इतर धर्मीयांनी मशीद बघण्याकरिता गर्दी केली होती. पुलवामा हल्ल्याच्या निषेधात शहरात विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून पाकिस्तानविरोधात निदर्शने करण्यात आली. तर अभिनंदन वर्तमान यांची पाकिस्तानने सुटका केल्यानंतर आतषबाजी झाली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply