nagpurruralNews

प्रसिद्धीच्या हव्यासासाठी जिल्हाधिकाऱ्याचा उद्दामपणा!

22Views

अकोला:-

अकोला शहरात नुकत्याच पार पडलेल्या मोर्णा महोत्सवात मनाजोगी प्रसिद्धी न मिळाल्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी पत्रकारांवर रोष व्यक्त केला. इतकंच नव्हे तर त्यांनी दूषित पाणी देऊन आणि धूर करून पत्रकारांचे स्वागत करण्याचा निषेधार्ह प्रकार त्यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने मोर्णा स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले होते. या अभियानाला मोठी प्रसिद्धी मिळाल्यामुळे थेट पंतप्रधानांनी या मोहीमेची दखल घेतली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मोर्णा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी अकोल्यातील सर्वच वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकारांना बंगल्यावर चहापानाचे निमंत्रण दिले होते. मात्र, त्यावेळी उपस्थितांना त्यांनी दूषित पाणी दिले. कर्मचाऱ्याला आदेश देत टोपल्यामध्ये अर्धवट जळालेला काडीकचरा आणला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मोर्णा महोत्सवाला प्रसिद्धी का दिली नाही असा प्रश्न उपस्थित करत अरेरावीपणा केला. यावेळी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीचा निषेध केला. बातमी प्रकाशित करण्याचे अधिकार संपादकांकडे असतात आणि ते कोणाही हिरावून घेऊ शकत नसल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार यांना ठणकावत पत्रकार बैठकीतून बाहेर पडले.

या प्रकारानंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी सर्व संबंधित वृत्तपत्र कार्यालयात जाऊन माफी मागितली. माझा कोणाचाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र, माझ्या वागण्यातून कोणी दुखावले असल्यास त्याबद्दल माफी मागत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मोर्णा महोत्सव हे एका खासगी संस्थेमार्फत झाले होते. त्यात प्रशासनाचा कोणताही सहभाग नसतानादेखील जिल्हाधिकाऱ्यांना एवढा रस का असावा असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply