News

प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाचा, परिणाम होणार नाही.

8Views

लखनऊ :-

प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाचा, भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेशातील राजकीय निकालांवर काहीही परिणाम होणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथयांनी शनिवारी केले. ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी राज्यातील समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची आघाडीतच वाद सुरू झाल्याचा दावाही त्यांनी केला.

काँग्रेसने प्रियांकांकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे. त्यावर विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना योगी म्हणाले, ‘हा कॉँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. यापूर्वीही तिने कॉँग्रेसच्या प्रचाराची धुरा वाहिली आहे. यावेळीही ती पक्षाची प्रचारक आहे. त्यामुळे भाजपच्या मतांमध्ये काहीही फरक पडणार नाही.’

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पहिल्याच मुलाखतीत ४६वर्षीय योगींनी विविध राजकीय विषयांवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष आघाडी बिनकामाची असून त्यांच्यातच काही जागांवरून मतभेद असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. उगीचच ‘हवा’ करण्याचा प्रयत्न काही पक्ष करीत आहेत. मात्र मतदार हुषार असून कोणत्या पक्ष आणि नेत्याच्या हाती देशाचे भवितव्य सुरक्षित, उज्ज्वल आणि धर्मनिरपेक्ष राहील त्यांनाच मते मिळतील. भाजपसाठी ही निवडणूक सुवर्णसंधी आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फक्त नावावर भारतीयांनी २०१४मध्ये मते दिली आता त्यांचे नाव (नाम) आणि काम पाहून भरघोस मते मिळतील. या वेळी भाजपला उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी ७४पेक्षा अधिक जागा मिळतील, असा आम्हाला विश्वास आहे. पाकिस्तान, म्यानमार आदी ठिकाणी मोदी सरकारने केलेल्या आक्रमक कारवाईने त्यांचे नेतृत्व उजळून निघाले आहे.

– योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

अशक्य ते शक्य करतील मोदी…

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यात मतदारांनी भाजपला झटका दिला आहे, याकडे लक्ष वेधले असता योगी म्हणाले, ‘एखाद्या राज्यात एखादा पक्ष दीर्घ काळ सत्तेत असला, तर थोडी सरकारविरोधी भावना तयार होते. मात्र मध्य प्रदेशात भाजपचा मतटक्का वाढला आहे. राजस्थानातही कामगिरी चांगली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी स्थानिक प्रश्नांवर मते दिली जातात. सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रश्नांची चर्चा असते, त्याचा भाजपलाच लाभ होईल. कॉँग्रेससह इतर विरोधी पक्ष जे करू शकत नाहीत, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी करू शकतात, यावर जनतेचा विश्वास बसल्याचा दावा योगी यांनी केला.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply