News

प्रेमप्रकरणाच्या संशयावरून वडिलांनी मुलीला जाळले

14Views

वसई :-

सतत मोबाइलवर बोलत राहणाऱ्या आपल्या मुलीचे प्रेमप्रकरण आहे या संशयावरून वडिलांनी तिला जाळल्याची घटना सोमवारी विरार पूर्वेला घडली. याप्रकरणी आरोपी मुर्तीजा मंसुरी याला पोलिसांनी अटक केली असून, ७५ टक्के भाजलेल्या १६ वर्षीय मुलीवर मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोपचरपाडा, नूर मंजील, विरार पूर्व येथे मंसुरी कुटुंब राहते. सोमवारी, ३१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शाहिस्ता मुर्तीजा मंसुरी मोबाइल फोनवर बोलत होती. तेव्हा तिच्याकडील मोबाइल मागून, कोणाबरोबर बोलत राहतेस, असा प्रश्न मुर्तीजा याने तिला विचारला. यावेळी दोघांमध्ये वाद झाल्यानंतर मुर्तीजाने तिचा मोबाइल जमिनीवर आपटून फोडून टाकला आणि तिला शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर रागाच्या भरात त्याने शाहिस्ताच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. तिचा आरडाओरडा ऐकून शेजारी त्यांच्या घरी धावले आणि त्यांनी शाहिस्ताला विरार येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची अवस्था पाहून तिला तातडीने मुंबईतील जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. शाहिस्ता ७५ टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिस उपअधीक्षक जयंत बजबळे यांनी सांगितले. दरम्यान, मुलीने स्वत:हून रॉकेल ओतून पेटवून घेतले असे मुलीची आई सांगत आहे. मात्र भाजलेल्या मुलीने स्वत: मुर्तीजाविरोधात फिर्याद दिल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. घरकाम करणाऱ्या आपल्या मुलीचे प्रेमप्रकरण आहे असा संशय मुर्तीजाला होता, असे पोलिसांनी सांगितले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply