News

‘ फायद्याचा प्रश्नच नाही निवडणुकीत’

37Views

बेंगळुरू :-

पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याचा आगामी लोकसभा निवडणुकीत फायदा होईल, असे वादग्रस्त वक्तव्य करून टीकेचे धनी ठरलेले पक्षाचे राज्यप्रमुख बी.एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी सपशेल घुमजाव केले. या कारवाईचा निवडणुकीत फायदा उठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपल्यासाठी देश सर्वप्रथम आहे, अशी सारवासारव त्यांनी केली.

‘दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षात उत्साह संचारला आहे. यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमधील २८पैकी जवळपास २२ जागा जिंकण्यासाठी मदत होईल’, अशा प्रकारचे वक्तव्य येडियुरप्पा यांनी बुधवारी केले होते. त्यानंतर त्यांच्याच पक्षातील नेत्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती, तर पाकिस्तानी प्रसारमाध्यमे व सत्ताधारी ‘तहरिक-ए-इन्साफ’नेसुद्धा युद्ध हा निवडणुकीतील फायदाचा मुद्दा होऊ शकतो का, असा सवाल भारतापुढे उपस्थित केला होता.

भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर येडियुरप्पा यांनी केलेल्या या वक्तव्यावरून सर्वच स्तरांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी गुरुवारी याबाबत स्पष्टीकरण केले. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. आपल्याला सैनिकांप्रति आदर असून, मी त्यांच्या शौर्याला सलाम करतो. अशा स्थितीत मी देशवासीयांसोबत असून, विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांच्या परतीसाठी प्रार्थना करतो, असे ट्विट त्यांनी केले आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply