News

फारूक इंजिनीयर यांनी हरभजनला सुनावले!

17Views
मुंबई:

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यानं रविचंद्रन अश्विन याच्यावर केलेल्या टीकेमुळं तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अश्विनवर टीका करणाऱ्या हरभजनला भारताचे माजी कर्णधार फारूक इंजिनीयर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘अशा प्रकारची टीका करणं हे खिलाडूवृत्तीचं लक्षण नाही,’ असं इंजिनीयर यांनी म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला फिरकीपटूची गरज होती, नेमक्या त्याच वेळी अश्विन जखमी झाला. उलट शेवटच्या कसोटीत संधी मिळालेल्या कुलदीप यादवनं उत्तम गोलंदाजी केली. त्यामुळं अश्विनऐवजी कुलदीपलाच कसोटी संघात पहिलं प्राधान्य मिळायला हवं, असं हरभजननं म्हटलं होतं.

क्रिकेट क्लब ऑफ इंडियातील टॉक शोमध्ये हरभजनच्या या टीकेबद्दल विचारलं असता इंजिनीयर संतापले. ‘हरभजनचं वक्तव्य मी ऐकलं. तो अत्यंत चुकीचं बोलतोय. एखाद्याच्या विरोधात जाहीरपणे असं बोलणं योग्य नाही. हरभजन अश्विनचा निंदक असल्यासारखाच बोलला आहे. खरंतर अश्विन एक महान फिरकी गोलंदाज आहे. आता त्यानं हरभजनची जागा घेतलीय. त्यामुळं हरभजननं त्याच्यावर असे ताशेरे ओढणं अजिबात रास्त नाही. हे म्हणजे महेंद्रसिंह धोनीनं ऋषभ पंतवर टीका करण्यासारखं आहे. ही खिलाडूवृत्ती नाही. याला क्रिकेट म्हणत नाहीत’, असं इंजिनीयर म्हणाले.

इंजिनीयर हे १९६०-७०च्या दशकात भारतीय संघातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक होते. केवळ उत्तम फलंदाजच नाही तर इंजिनीयर हे एक उत्कृष्ट यष्टिरक्षकही होते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply