News

बाबासाहेबांचा पुतळा हटविण्यासाठीही नोटीस.

24Views

नागपूर:-

 

धार्मिक स्थळांवरील कारवाईसोबतच शहरातील पुतळे व वाचनालय हटविण्याची नोटीसही मनपाने बजावली आहे. संविधान चौकानंतर दक्षिण नागपुरातील त्रिशरण चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. एवढेच काय तर यादीत इमामवाड्यायातील दलित वाचनालय तसेच मेकोसाबाग येथील सिंधी कॉलनीतील दरबार हटविणण्याचाही समावेश आहे. यादीत एक समाजभवनही हटविण्याचा समावेश आहे.

त्रिशरण चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविण्याची नोटीस धंतोली झोनने २० जुलै, २०१८ रोजी बजावली. या पुतळयाला अनेक वर्षे झाली. नागपुरात संविधान चौकातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळयानंतर या पुतळयाजवळ द क्षिण नागपुरातील सर्व समाजबांधव एकत्र येऊन माल्यार्पण करतात. हे स्थळ या भागातील स्फूर्तिस्थळ आहे. शिवाय, आता सेलिब्रेशन स्थळ म्हणूनही याची ओळख निर्माण झाली आहे. राजकीय सोबतच सामाजिक व इतरही उपक्रम या ठिकाणी साजरे करण्यात येतात. या पुतळयाचा समावेशही अनधिकृत यादीत करण्यात आला आहे. हा पुतळा हटवू नये, यासाठी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी मनपात धाव घेतली. सोबतच त्यांच्याकडे असलेले कागदपत्रे सादर केली.

उंटखाना चौकातील तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयांचाही यादीत समावेश आहे. या पुतळयाबाबत मनपा सभागृहातच एकमताने नियमित करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. १४ एपिल, १९९१ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर १२ ऑगस्ट १९९१ च्या महासभेत हा प्रस्ताव पारित करण्यात आला. यासंबंधीची कागदपत्रे माजी नगरसेविका सुजाता कोंबाडे यांनी सादर केली. त्यामुळे यादीतून हा पुतळा वगळण्यात येणार असल्याची माहिती आहे. यादीत सीताबर्डीतील आनंदनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, त्रिशरण चौकातीलच तथागत गौतम बुद्ध पुतळा, इमामवाडा, नाल्याजवळील दलित वाचनालय, रामबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सक्करदरा तलाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, नंदनवन झोपडपट्टी येथील डॉ. आंबेडकर मूर्ती (असा उल्लेख), नेहरूनगर ताजबाग शाळेजवळील गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पंचवटीनगर येथील समाज मंदिर, पंचवटी मोहल्ला येथील बौद्ध पुतळा, खलासी लाइन येथील बौद्ध पुतळा परिसर आदींचाही यादीत समावेश आहे.

टिंबर मार्केटजवळ तणाव, चार मंदिरांवर कारवाई

घाट रोडवरील, टिंबर मार्केट, प्रभाग क्र १७ मधील शिवलिंग मंदिर हटविण्यावरून मंगळवारी तणाव निर्माण झाला. दुपारनंतर पथक कारवाईला गेल्यानंतर मोठ्या संख्येत नागरिकांनी विरोध केला. नगरसेवक विजय चुटेले यांच्या नेतृत्वात व सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या उपस्थितीत मनपाच्या पथकासोबत चर्चा झाल्यानंतर पथक माघारी परतले. या मंदिरावर आठवडाभर कारवाई न करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी भाजपच्या दक्षिण प श्चिम मंडळाचे महामंत्री सचिन कारड़कर,सतीश सिरसवान, भावनजीभाई पटेल, निलेशभाई पटेल, किशोर डोरलीकर, प्रभाग क्र. १७ चे महामंत्री अशोक श्रीवात्री, प्रशांत तोमस्कर, किशोर जोशी तसेच या भागातील नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

दरम्यान, दिवसभराच्या कारवाईत मनपाने चार मंदिरांवर कारवाई केली. यात राजाबाक्षा येथील नाग मंदिर, विश्राम सोसायटी, नरेंद्रनगर रिंगरोड येथील नाग मंदिर, सुंदरबन रिंग रोड, नरेंद्रनगर पुलासमोरील शिव मंदिर तसेच अजनी रेल्वे ट्राफिक पोलिस गार्डनजवळील नागोबा मंदिराचा समावेश आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply