News

बाळासाहेब ठाकरेंमुळे संमेलन उधळले नाही !

28Views

माणूस जेवढा बुद्धिमान तेवढा कलहशील. मराठी साहित्याच्या व्यवहारातील मंडळी हुशार, त्यामुळेच ती वादात रमताहेत. साहित्य संमेलनाच्या मंचावर राजकारण्यांनी यावे काय? नयनतारा सहगल यांना बोलवावे काय, असे प्रश्‍न निर्माण झाले ते अशा वादात हुशारांना रस असल्यानेच. पण खरे सांगायचे तर साहित्याच्या या मंचावर सर्वांनीच यावे.

रामायण, महाभारतावर पोसल्या गेलेल्या या समाजात सहिष्णुता कुणीही शिकवण्याची गरज नाही, ती उपजत आहे; रक्‍तात आहे, त्यामुळे उद्‌घाटक काय बोलले असते या वादात जाण्याचे कारण नव्हते. कोकणाची पार्श्‍वभूमी असलेल्या नयनतारा या त्यांची मते मांडून गेल्या असत्या. पण झाले भलतेच.

खरे सांगायचे तर त्या त्या संमेलनाला साजेसा उद्‌घाटक बोलवण्याची गरज महामंडळाला समजून घ्यायची असते. यजमान, स्वागताध्यक्ष काहीही लादत नाहीत, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. पण संमेलनात घोळ होणार नाही, अकारण वाद झडणार नाहीत हे पाहणे महामंडळाचे कर्तव्य असते. यवतमाळात ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना बोलावणे कितपत उचित होते, हा खरेच प्रश्‍न होता. तेथे महामंडळ चुकले. अर्थात एकदा पाठवलेले निमंत्रण मागे घेणे तर त्याहून वाईट. संपूर्णत: अयोग्य. पण तेही झाले. त्यानंतर टाकला गेला संमेलनावर बहिष्कार. तोही दुर्दैवी होता. निमंत्रण स्वीकारले होते तर जाणे योग्य ठरले असते. नयनतारा नको का होत्या?

त्या व्यवस्थेला विरोध करतात म्हणून, हे जर भडक असेल तर त्यांना बोलावून अचानक येऊ नका, हे सांगणे त्याहूनही अधिक भडक. मात्र एकदा सगळेच बाण सुटल्यावर संमेलनाची प्रतिष्ठा निभावून नेणे गरजेचे. मराठी साहित्यिक नेभळट नाहीत हे समाज जाणतो. निषेध व्यक्‍त केला तो कळला. लग्नात मानापमान होतात. पण वऱ्हाडी वाजंत्री तेथे जातातच. त्यांचा स्वर मोठा आनंद निर्माण करतो. यवतमाळकर साहित्य ऐकण्यास उत्सुक होते. बहुतांची अंतरे राखणारा विवेकवादी विचार हा महाराष्ट्रधर्म आहे,

तोच साहित्य संमेलनाचा आत्मा असायला हवा. अरुणा ढेरे ही यावर्षीची संमेलनाध्यक्ष. प्रथमच सहमतीने निवडून आलेली. डॉ. रा. चिं. ढेरेंचा वसा ती चालवते. तिने संमेलनाध्यक्ष या नात्याने व्यक्‍त केलेले चिंतन मननीय आहे. ती एका अर्थाने तरुण पिढीची प्रतिनिधी आहे. मी 57 व्या वर्षी अध्यक्षपदी निवडून आलो.

तिला मान मिळाला हे योग्य होते. संमेलन उधळण्याची भाषा अशोभनीय होती. मी रत्नागिरी संमेलनाचा अध्यक्ष होतो तेव्हाही एक अप्रिय प्रसंग घडणार होता. एका तरुण कवीने वसईच्या पार्श्‍वभूमीवर कविता सादर केली. त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोघांवरही टीका होती.

पवार तर संमेलनाचे उद्‌घाटक. ते उद्‌घाटन करून गेल्यावर कवितेचे सादरीकरण झाले. त्यांच्याकडून तर काही निरोप आले नाहीत, पण शिवसेनेत मात्र कमालीची अस्वस्थता पसरली. संमेलन उधळण्यासाठी मुंबईहून दोन गाड्या निघाल्या. सध्याचे मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वात सैनिक आहे. आयोजकांनी सांगितले, आधी संमेलनाध्यक्षांना भेटा. देसाई तयार झाले. मी त्यांचे सगळे ऐकून घेतले.

शिवसेनाप्रमुखांना लक्ष्य केले गेले ही त्यांची तक्रार. मी म्हणालो, मला एकदा बाळासाहेबांशी बोलू द्या. देसाई कमालीचे सभ्य. त्यांनी विनंती मान्य केली. मी फोनवर बाळासाहेबांना क्षेमकुशल विचारले अन्‌ सांगितले तुम्ही कुंचल्याने व्यंग्य काढता ना तसेच त्या कवीने कवितेतून व्यंग्य चितारले. सोडून द्या ना, तुम्ही उमदे आहात. बाळासाहेबांनी असे म्हणतोस म्हणत लगेच आंदोलकांना परत फिरण्यास सांगितले.

संमेलन उधळणे, आंदोलन करणे अयोग्य तसेच बहिष्कार टाकणेही अवाजवी. संमेलनाचा रसभंग होईल असे वागायचे नसते. आता झाले ते झाले, महाराष्ट्र रसिक आहे, त्याला डावी-उजवी बाजू नाही. पुढील वर्षी अधिक साकल्याने विचार करीत संमेलनातला वाद टाळला जाईल, अशी अपेक्षा करू.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply