News

बिइंग ह्युमन करणार बारामतीत सामाजिक काम

14Views

दौंड:-

‘अभिनेता सलमान खान यांची बिइंग ह्युमन संस्था बारामती लोकसभा मतदार संघात गरजवंतासाठी काम करणार आहे. नुकतीच सलीम खान यांनी ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी बारामती मतदार संघात टाटा ट्रस्टने मुलींचे शाळेतील घटते प्रमाण रोखण्यासाठी वाटलेल्या हजारो सायकलींची माहिती घेतली आणि आणि बिइंग ह्युमन संस्थेमार्फत मतदारसंघात आरोग्य व इतर क्षेत्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली,’ अशी माहिती माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

दौंड उपजिल्हा रुग्णालयात सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुळे यांच्या प्रयत्नातून दौंड उपजिल्हा रुग्णालयात भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभाग, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलीमको) कानपूर आणि जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्या विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांना विविध साहित्य देण्यासाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. ‘शिबिरात हजारोंच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. यासाठी दौंड तालुक्यातील २७८ आशा वर्कर यांनी घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांची आणि त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांची माहिती गोळा करून अर्ज भरून घेतले. यामुळे आजच्या शिबिरात सुळे यांनी आशा वर्करचे विशेष कौतुक केले. त्यांच्याशिवाय हे काम झाले नसते. आशा वर्कर या वयोश्री शिबिराच्या ‘स्टार ऑफ द शो’ आहेत,’ असे त्या म्हणाल्या.

बारामती लोकसभा मतदारसंघात टाटा ट्रस्टने यशवंतराव चव्हाण ट्रस्टच्या माध्यमातून मुलींना दुर्गम भागातून शाळेत पोहोचण्यासाठी १५ हजार सायकलींचे वाटप केले. हे काम योग्य चालल्याचे पाहून त्यांनी आणखी ९ हजार सायकली वाटण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. टाटांचा विश्वास महत्त्वाचा आहे. त्यांनी आमच्या कामावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता बिइंग ह्युमनसारख्या अनेक एनजीओ बारामती मतदारसंघात काम करण्यासाठी पुढे आल्या आहेत. टाटांचा विश्वास आमच्यासाठी मोठे प्रशस्तीपत्रक आहे. ज्येष्ठ नागरिकांसह इतरांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक आरोग्य योजना आहेत. आम्ही योजना आणि लाभार्थी यांच्यातील पूल आणि दुवा म्हणून काम करतो. त्यांना योग्य उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो.
– सुप्रिया सुळे, खासदार, बारामती

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply