nagpurruralNews

ब्रह्मोसचे दहा अधिकारी ‘रडार’वर

28Views

नागपूर:-

‘ब्रह्मोस संदर्भातील जी माहिती माझ्या वैयक्तिक लॅपटॉपवर आढळली, तशीच माहिती ब्रह्मोस एअरोस्पेसच्या तब्बल दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरसुद्धा उपलब्ध आहे’, असा खळबळजनक दावा हेरगिरीच्या आरोपात अटकेत असलेल्या ब्रह्मोस एअरोस्पेसच्या सिस्टीम इंजिनीअर निशांत अगरवाल याने केला आहे.

निशांतच्या लॅपटॉपवरून ‘अतिसंवेदनशील’ प्रकारात मोडणारी माहिती जप्त करण्यात आली आहे. नागपुरात विकसित झालेल्या ब्रह्मोसचे ‘वॉरहेड इंटिग्रेशन’ फुटल्याचा संशय आहे. भारत आणि रशिया यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘ब्रह्मोस एअरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’तर्फे जलदगतीने मारा करणारे ब्रह्मोस क्षेपणास्त्र तयार केले जाते. त्याबाबतची माहिती असलेला निशांतचा हा लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान निशांतने एटीएसला दिलेल्या माहितीनुसार, याप्रकारची अतिसंवेदनशील माहिती ब्रह्मोस एअरोस्पेसच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरसुद्धा उपलब्ध आहे. अशा दहा अधिकाऱ्यांची नावे निशांतने एटीएसला सांगितल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. यानंतर हे दहा अधिकारीसुद्धा रडारवर आल्याचे सांगितले जात आहे. याखेरीज निशांतच्या वैयक्तिक लॅपटॉपवर ही माहिती का आली, या प्रश्नावर मात्र निशांत एटीएसला समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. याखेरीज निशांत यापूर्वी हैदराबाद येथे कार्यरत होता. त्यावेळी एलन अब्राहम नावाची व्यक्ती तेथे वरिष्ठ सिस्टीम इंजिनीअर म्हणून कार्यरत होती. काही काळानंतर अब्राहम पीएच.डी.साठी कॅनडाला गेला. निशांतने चार ‌‌वर्षांपूर्वी अब्राहमच्या परवानगीशिवाय त्याच्या सिस्टीममधूनसुद्धा काही माहिती स्वत:च्या पेनड्राइव्हमध्ये घेतली होती, असेही पुढे आले आहे.

कॉपी होत नसल्याने लढविली शक्कल

ब्रह्मोस एअरोस्पेसमधील काही गोपनीय माहिती पेनड्राइव्हमध्ये ‘कॉपी’ करता येत नाही. परंतु, निशांत हा कुशाग्र बुद्धिमत्तेचा आहे. त्याने या माहितीचे प्रिंट स्क्रीन घेतल्याची शक्यता आहे. इतकेच नाही, तर ही माहिती स्क्रीनवर असताना त्याने आपल्या मोबाइल अथवा कॅमेऱ्यावर स्क्रीनचा व्हिडीओ घेतला आहे. या प्रकारचे व्हिडीओज त्याच्या लॅपटॉपमध्ये आढळून आले आहेत.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply