News

ब्राह्मण महासंघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

16Views

कोल्हापूर :-

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. १) विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. महासंघाने मागण्यांचे निवेदन दिले असून, आठवड्याभरात यावर ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, अशी माहिती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी दिली.

ब्राह्मण महासंघाच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय महासंघाच्या वतीने राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. यासाठी २०१३ पासून वारंवार निवेदने दिली जात आहेत. महासंघाच्या शिष्टमंडळाने ११ डिसेंबरला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन समाजासमोरील समस्यांची चर्चा केली होती. त्यावेळी मंत्री पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडविण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार मंगळवारी मुंबई येथे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले.

ब्राह्मण समाजाचे सक्षमीकरण करणे, समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी व तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज निवेदनातून व्यक्त केली आहे. शिष्टमंडळाने मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आठवड्याभरात ठोस निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. यावेळी महासंघाच्या प्रदेश महिला अध्यक्ष मोहिनी पत्की, युवा प्रदेश अध्यक्ष निखिल लातूरकर, ठाणे जिल्हाध्यक्ष अमरेंद्र पटवर्धन आदी उपस्थित होते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply